शाहिद अफ्रिदीला निवृत्तीनिमित्त विराट कोहलीकडून खास गिफ्ट
By Admin | Updated: April 19, 2017 11:38 IST2017-04-19T11:36:07+5:302017-04-19T11:38:18+5:30
पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदीने निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीची जर्सी त्याला भेट दिली आहे

शाहिद अफ्रिदीला निवृत्तीनिमित्त विराट कोहलीकडून खास गिफ्ट
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघ खेळत असतो तेव्हा ते एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणूनच खेळत असतात. पण एकदा का मैदानाबाहेर पाऊल पडलं की तेव्हा मात्र मैत्रीचे वारे वाहत असतात. असाच काहीसा अनुभव सध्या येताना दिसत आहे. राजकारणापासून ते बॉलिवूडपर्यंत कोणताही विषय निवडला तरी भारत - पाकिस्तानमध्ये काही ना काहीतरी वाद किंवा कटूता असतेच. पण क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं तर खेळाडू मात्र हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. खेळाडूंमधील या मैत्रीचा प्रत्यय सध्या एका फोटोमुळे जाणवू लागला आहे.
पाकिस्तानचा खेळाडू शाहिद आफ्रिदीने निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीची जर्सी त्याला भेट दिली आहे. इतकंच नाही तर या जर्सीवर टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी आहे. तुमच्यासोबत खेळणं हा नेहमीच सर्वोत्तम अनुभव होता, असं विराटच्या जर्सीवर लिहिलेलं आहे. या जर्सीवर कोहलीसोबत, युवराज सिंह, आशीष नेहरा, जसप्रीत बुमरा, सुरेश रैना, पवन नेगी, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांची सही आहे.
एका पाकिस्तानी पत्रकाराने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या ट्विटला अनेक सकारात्मक प्रतिसाद मिळत असून विराट कोहली आणि टीम इंडियाचं कौतुक होत आहे. शत्रु हा फक्त मैदानावर असला पाहिजे, मैदानाबाहेर नाही असं काहींनी म्हटलं आहे.
Virat Kohli's shirt, signed by Indian team, for Shahid Afridi, with a message "always a pleasure playing against you." pic.twitter.com/KexlCjTNeZ
— Faizan Lakhani (@faizanlakhani) April 15, 2017
विशेष म्हणजे विराट कोहलीने अशा प्रकारे पाकिस्तानी खेळाडूला खास गिफ्ट देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी गेल्यावर्षी जेव्हा ईडन गार्डन्स मैदानावर भारत - पाकिस्तान सामना पार पडला होता. त्यावेळी विराट कोहलीने पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीरला आपली बॅट गिफ्ट केली होती.