‘डेव्हिस कप’वर दहशतीची छाया
By Admin | Updated: November 25, 2015 23:32 IST2015-11-25T23:32:11+5:302015-11-25T23:32:11+5:30
पॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बेल्जियम येथे येत्या शुक्रवारपासून होणाऱ्या डेव्हिस कप फायनल स्पर्धेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘डेव्हिस कप’वर दहशतीची छाया
बेल्जियम : पॅरिस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बेल्जियम येथे येत्या शुक्रवारपासून होणाऱ्या डेव्हिस कप फायनल स्पर्धेसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ब्रिटनचा अँडी मरे विजेतेपदासाठी सज्ज झाला असून, देशाला १९३६ नंतर जेतेपद मिळवून देण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.
पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बेल्जियमचे मूळ निवासी सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान, बेल्जियम व ब्रिटनमध्ये होणाऱ्या डेव्हिस कप फायनल स्पर्धेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मरे याच्या नेतृत्वाखाली ब्रिटनचा संघ ब्रेसेल्सपासून ५५ किलोमीटर दूर असलेल्या घेंट या ठिकाणी पोहोचला आहे. संघाच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच संशयित दहशतवाद्याच्या शोधासाठी सुरक्षा यंत्रणाची शोधमोहीम सुरू असल्याने वातावरणात तणाव जाणवत आहे.
दहशतवादी हल्ल्याच्या सावटाखाली ही स्पर्धा होत असल्याने प्रेक्षकांवरदेखील त्याचा एक वेगळा परिणाम जाणवू शकतो. या स्पर्धेसाठी प्रेक्षक न आल्यास ते समजून घेण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया एका ब्रिटिश खेळाडूने दिली.