आॅस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत

By Admin | Updated: July 31, 2015 00:48 IST2015-07-31T00:48:46+5:302015-07-31T00:48:46+5:30

पहिल्या डावात १४५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाऱ्या इंग्लंडने स्टीव्हन फिनच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात विजयाकडे कूच केली आहे.

In the shadow of Australia defeat | आॅस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत

आॅस्ट्रेलिया पराभवाच्या छायेत

बर्मिंगहॅम : पहिल्या डावात १४५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाऱ्या इंग्लंडने स्टीव्हन फिनच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर तिसऱ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात विजयाकडे कूच केली आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आॅस्ट्रेलियाची ७ बाद १६८ अशी दयनीय स्थिती झाली होती. त्यांच्याकडे फक्त २३ धावांची आघाडी असून त्यांचे केवळ ३ फलंदाज बाकी आहेत. आज खेळ थांबला तेव्हा पीटर नेव्हील ३७ आणि मिशेल स्टार्क ७ धावांवर खेळत होते.
पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या आॅस्ट्रेलियाची फलंदाजीची फळी स्टीव्हन स्मिथच्या धारदार गोलंदाजीसमोर सपशेल ढेपाळली. त्यांच्याकडून फक्त डेव्हिड वॉर्नरने ६२ चेंडूंत ११ चौकारांसह ७७ आणि नेव्हीलने ३ चौकारांसह ३७ धावा काढताना एकाकी झुंज दिली. इंग्लंडकडून स्टीव्हन फिन याने ४५ धावांत ५ गडी बाद केले. त्याला अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी १ गडी बाद करीत साथ दिली.
त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात ६७.१ षटकांत सर्व बाद २८१ धावा केल्या. त्यांच्यातर्फे जो रुट याने सर्वाधिक ७५ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह ६३, मोईन अलीने ७८ चेंडूंत ११ चौकारांसह ५९, इयान बेलने ५३ आणि स्टुअर्ट ब्रॉडने ५५ चेंडूंत ३ चौकारांसह ३१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. आॅस्ट्रेलियाकडून हेजलवूड आणि नाथन लियोन यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे ७४ व ३६ धावा मोजल्या. त्यांना मिशेल स्टार्क आणि मिशेल जॉन्सन यांनी प्रत्येकी २ बळी घेत साथ दिली.
पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ आता १-१ अशा बरोबरीत आहेत. इंग्लंडने आज ३ बाद १३३ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. जॉनी बेयरस्टॉने जोश हेजलवूडच्या चेंडूवर चौकार मारत इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली; परंतु मिशेल जॉन्सनने त्याच्या तीन चेंडूंच्या आत दोन गडी बाद करीत आॅस्ट्रेलियाला मुसंडी मारून देण्यात यश मिळविले. बेयरस्टॉ फक्त ५ धावा काढून जॉन्सनच्या चेंडूवर यष्टिरक्षक पीटर नेविलच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. हा जॉन्सनचा ३00 वा बळीदेखील होता. दोनच चेंडूंनंतर त्याने बेन स्टोक्स यालादेखील यष्टिपाठीमागे झेलबाद केले. त्यामुळे इंग्लंडची स्थिती ५ बाद १४२ अशी झाली.
कार्डिफ येथे पहिल्या कसोटीत शतक ठोकणाऱ्या रुटने एका बाजूने झुंज दिली. तथापि, त्याने त्याच्याच चुकीने विकेट गमावली. रुटने मिशेल स्टार्कच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात स्लीपमध्ये अ‍ॅडम वोजेसच्या हाती झेल दिला. त्यानंतर लियोनने जोस बटलर (७) याला पायचीत केले. उपाहाराला
खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने ७ बाद
२२१ धावा केल्या होत्या. त्यानंतर
मोईन अली आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी आठव्या गड्यासाठी १९.३ षटकांत ८७ धावांची भागीदारी करीत इंग्लंडची आघाडी वाढवली. आॅस्ट्रेलियाने ४ धावांच्या अंतरातच ३ फलंदाजांना गमावताना इंग्लंडची मोठी आघाडी घेण्याच्या आशेला तडा दिला. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : १३६. दुसरा डाव : ७ बाद १६८. (डेव्हिड वॉर्नर ५५ षटकात ७ बाद १६८. (डेव्हिड वॉर्नर ७७, नेव्हिल खेळत आहे ३७. फिन ५/४५, अँडरसन १/१५, ब्रॉड १/३६).
इंग्लंड : पहिला डाव २८१. (जो रुट ६३, इयान बेल ५३, मोईन अली ५९, स्टुअर्ट ब्रॉड ३१. हेजलवूड ३/७४, लियोन ३/३६, स्टार्क २/७१, जॉन्सन २/६६)

मिशेल जॉन्सनचे ३०० बळी
मिशेल जॉन्सनने इंग्लंडविरुद्ध एजबेस्टन येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बेयरस्टाच्या रूपाने आपला ३00 वा बळी घेतला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील २८ वा आणि आॅस्ट्रेलियाचा पाचवा गोलंदाज आहे. आपला ६९ वा सामना खेळणाऱ्या जॉन्सनने २,000 धावा आणि ३00 बळी, अशी दुहेरी कामगिरी केली आहे. वॉर्ननंतर अशी कामगिरी करणारा तो आॅस्ट्रेलियाचा दुसरा क्रिकेटर आहे.

स्टेनचे ४०० विकेटस् पुर्ण
आपल्या गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांवर दहशत निर्माण करणाऱ्या दोन तेजतर्रार गोलंदाज डेल स्टेन आणि मिशेल जॉन्सन यांनी आज आपल्या कारकीर्दीत वैशिष्ट्यपूर्ण विक्रम केला आहे. स्टेन कसोटी क्रिकेटमधील ४00 बळी घेणारा जगातील १३वा गोलंदाज बनला आहे, तर आॅस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सनचा ३00 गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत समावेश झाला आहे. स्टेनने बांग्लादेशविरुद्ध मीरपूर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी पहिल्या दिवशी तमीम इकबालच्या रूपाने त्याचा ४00 वा बळी घेतला. अशी कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा तो दुसरा गोलंदाज ठरला. याआधी माजी कर्णधार शॉन पोलॉकने ४२१ गडी बाद केले आहेत.

Web Title: In the shadow of Australia defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.