सेव्हिलाने जिंकली युरोपियन लीग
By Admin | Updated: May 16, 2014 05:30 IST2014-05-16T05:30:27+5:302014-05-16T05:30:27+5:30
युरोपियन लीगमधील अत्यंत रोमहर्षक अंतिम सामन्यात सेव्हिलाने पोर्तुगालच्या बलाढ्य बेनफिका संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी मात करीत युरोपियन लीगवर आपले नाव कोरले.

सेव्हिलाने जिंकली युरोपियन लीग
तुरीन : युरोपियन लीगमधील अत्यंत रोमहर्षक अंतिम सामन्यात सेव्हिलाने पोर्तुगालच्या बलाढ्य बेनफिका संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी मात करीत युरोपियन लीगवर आपले नाव कोरले. बेनफिका सलग सातव्यांदा अंतिम फेरीत अपयशी ठरला. बेनफिकाने ५२ वर्षांनंतर आलेल्या विजयाच्या संधीसाठी मोठी तयारी केली होती. सामन्याच्या प्रारंभापासूनच सेव्हिलाच्या संघाने चेंडूवर पकड मिळवली होती. जास्तीत जास्त वेळ चेंडू त्यांच्याच ताब्यात होता. सामन्याच्या ९व्या मिनिटाला सेव्हिलाच्या कार्लोस बाक्काला एक चांगली संधी आली होती; मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात त्याला अपयश आले. बेनफिकाच्या निकोलस गाईटनला मिळालेल्या फ्री किकचेही गोलमध्ये रूपांतर झाले नाही. सेव्हिलाच्या राकेटिकने अनेक सुंदर चाली रचून बेनफिकाच्या खेळाडूंचा कस पाहिला; मात्र दोन्ही संघांच्या खेळाडूंना गोल करण्यात अपयश येत होते. सामन्यातील शेवटची १० मिनिटे शिल्लक असताना दोन्ही संघांनी गोल करण्याचे अटोकाट प्रयत्न केले; मात्र त्यात कोणत्याही संघाला यश आले नाही. अतिरिक्त वेळेत सेव्हिलाच्या बेटोने गोल करण्याचा प्रयत्न केला. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे पेनल्टी शूटचा अवलंब करण्यात आला. पेनल्टी शूटआऊटमध्ये सेव्हिलाच्या केव्हिन गामेरिओ, कोक, स्टीफन बिया, कार्लोस बाक्का यांनी गोल केले. तर बेनफिकाच्या ल्युसियानो, लिमा यांनी चेंडू जाळीत धाडला. मात्र, बेनफिकाच्या रॉड्रिगो आणि आॅस्कर कॉर्डझो यांना गोल करण्यात अपयश आले.