ऋतुजा सातपुतेचे विक्रमी सुवर्णपदक
By Admin | Updated: February 9, 2015 02:44 IST2015-02-09T02:44:25+5:302015-02-09T02:44:25+5:30
ऋतुजा सातपुतेने सायकलिंग महिलांच्या वैयक्तिक २८ किलोमीटर टाईम ट्रायल प्रकारात प्रथम क्रमांक जिंकून महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.

ऋतुजा सातपुतेचे विक्रमी सुवर्णपदक
तिरुअनंतपुरम : ऋतुजा सातपुतेने सायकलिंग महिलांच्या वैयक्तिक २८ किलोमीटर टाईम ट्रायल प्रकारात प्रथम क्रमांक जिंकून महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. दुसरीकडे अभिनंदन भोसलेने पुरुषांच्या १२६ किलोमीटर मास स्टार्ट प्रकारात महाराष्ट्राला कांस्यपदक दिले. शनिवारी झालेल्या वॉटरपोलो प्रकारात महिला संघाने रौप्य आणि पुरुष संघाने कांस्यपदक जिंकले होते.
महिलांच्या २८ किलोमीटर वैयक्तिक टाईम ट्रायल प्रकारात प्रत्येक सायकलपटूला १४ किलोमीटरच्या दोन फेऱ्या मारायच्या होत्या. या शर्यतीत ऋतुजाने ४६ मिनिटे ४९. १४५ सेकंदांत पूर्ण करून सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला. केरळच्या कृष्णनेंदू टी कृष्णाने रौप्य (४८ मि. ०७.९६१ से.), तर महिता मोहनने (४८ मि. २०.३५७ से.) कांस्यपदक जिंकले.
त्रिवेंद्रम येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऋतुजाच्या वडीलांनी पुरुषांच्या १०० मीटर टीम टाईम ट्रायल प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.
पुरुषांच्या १२६ मास स्टार्ट सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राच्या अभिनंदन भोसलेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अभिनंदनने सात किलोमीटरच्या १८ फेऱ्या मारताना ३ तास २६ मिनिटे ३४ सेकंदांची वेळ नोंदविली. या प्रकारात कर्नाटकच्या पंकज कुमारने ३ तास २६ मिनिटे३२ सेकंदांची वेळ नोंदवून सुवर्णपदक, तर कर्नाटकच्याच लोकेशने कांस्यपदक जिंकले.
वॉटरपोलो प्रकारात महाराष्ट्राच्या महिलांनी आपल्या गटातील चारपैकी तीन सामने जिंकून रौप्यपदक जिंकले. महाराष्ट्राकडून सायली गुधेकर, वैष्णवी श्रीवास, सई शेट्ये, शलाका धामणगावकर, राजश्री गुगळे, कोमल किरवे, मानसी गावडे, पायल अजमिरे, पूजा कुमारे, स्वप्नाली सूर्यवंशी, निहारिका परीहार, सांजली वानखेडे, पूजा कोसे यांनी कांस्य जिंकताना उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
पुरुषांच्या वॉटरपोलोमध्ये अर्जुन कावळेने चार, सुमित गव्हाणे, उदय उत्तेकर यांचे प्रत्येकी दोन आणि अश्विनीकुमारने केलेल्या एका गोलच्या जोरावर महाराष्ट्राने चुरशीच्या झालेल्या लढतीत पश्चिम बंगाल संघाचा ९-८ असा अवघ्या एका गोलने पराभव करून कांस्यपदक जिंकले. पश्चिम बंगालकडून मोहनने तीन, प्रीतिश दास, सतदीप, अर्जित दास, राजेश शर्मा व सोमनाथ रॉयने प्रत्येकी एक गोल केला. (वृत्तसंस्था)