विंडीजविरुद्धची मालिका निर्धोक : बीसीसीआय
By Admin | Updated: October 10, 2014 04:44 IST2014-10-10T04:44:45+5:302014-10-10T04:44:45+5:30
वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू आणि त्यांच्या बोर्डादरम्यान वेतन वादावरून खडाजंगी सुरू असली तरी मालिकेवर कुठलेही संकट नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले.

विंडीजविरुद्धची मालिका निर्धोक : बीसीसीआय
नवी दिल्ली : वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू आणि त्यांच्या बोर्डादरम्यान वेतन वादावरून खडाजंगी सुरू असली तरी मालिकेवर कुठलेही संकट नसल्याचे स्पष्टीकरण बीसीसीआयने दिले.
बीसीसीआय सचिव संजय पटेल म्हणाले, ‘भारत-विंडीज मालिकेला कुठलाही धोका नाही हे मी स्पष्ट करूइच्छितो. सर्व सामने निर्धारित वेळापत्रकानुसार होतील. मी स्वत: विंडीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी मला कुठलाही व्यत्यय येणार नाही, असे आश्वासन दिले. मला विंडीज बोर्डाचे अध्यक्ष डेव्ह कॅमरून यांचा ई-मेल मिळाला. त्यात त्यांनी संकट टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल बीसीसीआयचे आभार मानले आहेत.’ मालिका आटोपल्यानंतर हे संकट सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यास बीसीसीआयला आनंद होईल, असे सांगून पटेल पुढे म्हणाले, ‘तीन कसोटी, पाच वन-डे आणि एक टी-२० सामन्यांचा समावेश असलेली ही मालिका सहीसलामत पार पाडण्यात आम्हाला आनंद वाटेल. भविष्यातील दौरा कार्यक्रमांतर्गत हा दौरा असून, या कॅलेंडरचे उल्लंघन करण्यात येऊ नये. सर्व सदस्य देश या कॅलेंडरचे पालन करीत असतात. विंडीजचे खेळाडू व्यावसायिक असल्यामुळे ते एकत्र बसून समस्येवर तोडगा काढू शकतात. आमची गरज असेल तर मध्यस्थी करण्यास बीसीसीआय तयार आहे.’
कोची सामन्यात खोळंबा येऊ नये यासाठी बीसीसीआयने विंडीज खेळाडूंना किंवा त्यांच्या बोर्डाला पैसे दिल्याच्या वृत्ताचे पटेल यांनी खंडन केले. ते म्हणाले, ‘या केवळ अफवा आहेत. काहीही तथ्य नाही. बीसीसीआयने कुठलीही आर्थिक देवाण-घेवाण केली नाही आणि अशा आर्थिक देवाण-घेवाणीची योजना देखील नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. क्रिकेट बोर्ड या नात्याने समस्येवर तोडगा कसा काढावा या संदर्भात आम्ही केवळ सल्ला देऊ शकतो.’