सेरेनाची स्वप्नपूर्ती
By Admin | Updated: June 7, 2015 14:34 IST2015-06-07T00:51:07+5:302015-06-07T14:34:49+5:30
टेनिस कारकिर्दीत २० वा ग्रॅण्डस्लॅम पटकाविणे म्हणजे एक स्वप्नच. ही स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरविली ती अमेरिकेच्या सेरेना

सेरेनाची स्वप्नपूर्ती
पॅरिस : टेनिस कारकिर्दीत २० वा ग्रॅण्डस्लॅम पटकाविणे म्हणजे एक स्वप्नच. ही स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरविली ती अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने. महिला एकेरीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या या टेनिसपटूने चेक प्रजासत्ताकाच्या लुसी सफारोव्हाचा पराभव करीत फ्रेंच ओपनचा किताब पटकाविला. हा अंतिम सामना तिने ६-३, ६-७, ६-२ ने जिंकला. फ्रेंच ओपनचा एकेरीतील हा तिचा तिसरा किताब आहे.
अव्वल मानांकित सेरेनाने पहिला सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही आघाडी मिळवली होती. त्यानंतर पहिल्यादांच ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या लुसीने शानदार पुनरागमन केले.
सेरेनाची खराब सर्व्हिस आणि लुसीचा शानदार खेळ यांमुळे हा सामना तिसऱ्या सेटपर्यंत गेला. त्यानंतर सेरेना तिसऱ्या तसेच निर्णायक सेटमध्ये ०-२ अशी पिछाडीवर
गेली होती. त्यानंतर तिने सलग
सहा गेम जिंकत किताब आपल्या
नावे केला. याबरोबरच अमेरिकेच्या सेरेनाने एका वर्षात चार ग्रॅँडस्लॅमची विजेतीपदे पटकाविण्याकडे वाटचाल केली आहे. याआधी, तीन महिला खेळाडू एका वर्षांत चार ग्रॅण्डस्लॅम जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत. स्टेफी ग्राफने १९८८ मध्ये हा विक्रम साधला होता.
या पराभवानंतर लुसीने महिला मानांकनात पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. ही तिच्यासाठी समाधानकारक बाब ठरली.दुसरीकडे, सेरेनाचे आता पुढील लक्ष्य विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचे असेल. एकाच वेळी चारही ग्रॅण्डस्लॅम आपल्याकडे राखण्याचा तिचा प्रयत्न असेल. याआधी, २००३ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकत तिने ही किमया केली होती. (वृत्तसंस्था)
विक्रमाकडे...
-सेरेनाचे हे कारकिर्दीतील २० वे ग्रॅण्डस्लॅम. या जेतेपदानंतर ती आता स्टेफी ग्राफच्या दोन पावले मागे आहे. स्टेफीने २२ ग्रॅण्डस्लॅम पटकावली आहेत. सेरेनाची ही कारकिर्दीतील २४वी ग्रॅण्डस्लॅम फायनल होती. उल्लेखनीय म्हणजे, तिने केवळ चार वेळा अंतिम सामना गमावला आहे.
-यात दोनदा सेरेना बहीण व्हीनसकडून पराभूत झाली होती. याशिवाय, मारिया शारापोव्हा आणि समंता स्टोसूर यांनी तिच्यावर प्रत्येकी एकदा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या सत्रात फिट नसतानाही सेमीफायनलच्या मुकाबल्यात तिने टिमिया बसिंस्कीविरुद्धचा पहिला सेट गमावल्यानंतरही पुनरागमन
केले होते.