सेरेना ‘सेमी’त!
By Admin | Updated: June 4, 2015 01:25 IST2015-06-04T01:25:51+5:302015-06-04T01:25:51+5:30
अव्वल मानांकित सेरेना विलियम्सने पुन्हा धडाका कायम ठेवला. तिने इटलीच्या १७ व्या मानांकित सारा इराणी हिचा ६-१, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

सेरेना ‘सेमी’त!
पॅरीस : अव्वल मानांकित सेरेना विलियम्सने पुन्हा धडाका कायम ठेवला. तिने इटलीच्या १७ व्या मानांकित सारा इराणी हिचा ६-१, ६-३ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. याबरोबरच तिने प्रतिष्ठेच्या फे्रंच ओपन टेनिस स्पर्धेच्या ‘सेमीफायनल’मध्ये धडक दिली. कारकीर्दीतील २० वा ग्रॅन्डस्लॅम पटकाविण्याच्या प्रयत्नात असलेल्या सेरेनाचा सामना आता २३ व्या मानांकित स्वीत्झर्लंडच्या टिमिया बासिंजकी किंवा बेल्जियमच्या बिनमानांकित एलिसन वान यू यांच्यातील विजेत्या खेळाडूविरुद्ध होईल.
सानिया पराभूत; भारत बाहेर
भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची स्वित्झर्लंडची जोडीदार मार्टिना हिंगीस यांना महिला दुहेरी गटात पराभवाचा सामना करावा लागला. याबरोबरच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
सानियावर भारताची मदार होती. तिच्या पराभवामुळे भारताच्या आशा संपल्या. सानिया-हिंगीस या जोडीला अव्वल मानांकन होते. मात्र, त्यांना सातव्या मानांकित अमेरिकेच्या बेथानी माटेक सॅँडस आणि गणराज्यच्या लुसी सफारोव्हा यांच्याकडून ७-५, ६-२ ने पराभवाचा धक्का बसला. या सामन्यात सानिया-हिंगीस जोडीचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. दोन्ही खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूच्या ७० या गुणांपुढे ६१ गुण मिळवण्यात यशस्वी ठरले.
पहिल्या सेटमध्ये त्यांनी पुनरागमनाचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना हा सेट ७-५ ने गमावावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये तर बेथानी-लुसी या जोडीने सुरुवातीपासून वर्चस्व राखले होते. सुरुवातीलाच सानिया-हिंगीस जोडी ०-२ ने पिछाडीवर होती.