फ्रेंच ओपनमध्ये सेरेना, नदालवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:01 IST2018-05-24T00:01:53+5:302018-05-24T00:01:53+5:30
सेरेनाने पुनरागमनानंतर फक्त चार अधिकृत एकेरी सामने खेळले आहेत.

फ्रेंच ओपनमध्ये सेरेना, नदालवर लक्ष
पॅरीस : आगामी फ्रेंच ओपनमध्ये सर्वांचे लक्ष महिला गटात सेरेना विलियम्स आणि पुरूष गटात राफेल नदाल यांच्यावर असेल. सेरेना विल्यम्स एक वर्षापेक्षा जास्त काळानंतर ग्रॅण्ड स्लॅममध्ये खेळत आहे. २३ मेजर विजेतेपद पटकावणारी सेरेना २०१७ मध्ये आॅस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर पहिल्यांदा मोठ्या स्पर्धेत सहभागी होत आहे.
सेरेनाने पुनरागमनानंतर फक्त चार अधिकृत एकेरी सामने खेळले आहेत. तिने माद्रिद आणि रोममधील सराव सामन्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे जागतिक टेनिसवर वर्चस्व राखलेल्या सेरेनाला या अठवड्यात ४५३ वे मानांकन देण्यात आले आहे. फ्रेंच ओपनची गतविजेती येलेना ओस्टापेनाको हिने सेरेनाच्या पुनरागमनाविषयी सांगितले की,‘जर ती पुनरागमन करत आहे तर ते शानदार असेल.’ दुसरीकडे पुरुषांच्या गटात राफेल नदाल यंदा फ्रेंच ओपनचे विश्वविक्रमी ११वे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. पुरूषांच्या ड्रॉमध्ये सर्वांचे लक्ष त्याच्या कामगिरीवर असेल. व्यावसायिक टेनिसच्या काळात सहा पेक्षा जास्त फ्रेंच ओपनचे विजेतेपद अन्य कोणत्याही खेळाडूला पटकावता आलेले नाही. ‘किंग आॅफ क्ले’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या नदालला क्ले कोर्टवर पराभूत करणे कठीण आहे. (वृत्तसंस्था)
2009 चा विजेता आणि नदालचा कट्टर प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर यंदाही या स्पर्धेत खेळणार नाही. विम्बल्डनपूर्वी पुरेपूर विश्रांती घेत पूर्णपणे तंदुरुस्त राहण्यासाठी त्याने फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. तसेच, २०१६ साली उपविजेता राहिलेला ग्रेट ब्रिटनचा अँडी मरेदेखील दुखापतीतून सावरत आहे.