टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेसाठी ४५ खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 01:38 IST2015-04-29T01:38:35+5:302015-04-29T01:38:35+5:30
टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेसाठी आतापर्यंत ६ क्रीडा प्रकारांतील ४५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक १७ नेमबाजांचा समावेश आहे.

टार्गेट आॅलिम्पिक पोडियम योजनेसाठी ४५ खेळाडूंची निवड
नवी दिल्ली : २०१६मध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये जास्तीतजास्त पदके पटकावण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेसाठी आतापर्यंत ६ क्रीडा प्रकारांतील ४५ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक १७ नेमबाजांचा समावेश आहे.
केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये दिलेल्या उत्तरात सांगितले की, ‘या योजनेअंतर्गत आतापर्यंत अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, नेमबाजी, बॉक्सिंग, कुस्ती व सेलिंग या क्रीडा प्रकारांत ४५ खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यात गेल्या लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणारा नेमबाज विजय कुमार व मल्ल सुशील कुमार त्याचप्रमाणे कांस्यपदक पटकावणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, महिला बॉक्सर एमसी मेरीकोम, नेमबाज गगन नारंग व मल्ल योगेश्वर दत्त यांचा समावेश आहे.
निवड करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये १७ नेमबाज, ८ बॉक्सर, ७ मल्ल, ६ बॅडमिंटनपटू, ५ अॅथलेटिक्सपटू व सेलिंगच्या २ खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंच्या तयारीसाठी आतापर्यंत ९६.८० लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.’
क्रीडामंत्री म्हणाले, ‘क्रीडा मंत्रालयाने इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेडसोबत टॉप योजनेसाठी एक करार केलेला आहे. त्यानुसार कंपनी राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी (एनएसडीएफ) ३० कोटी रुपयांचे योगदान देणार आहे. याचा उपयोग टॉप योजनेसाठी करण्यात येणार आहे. ही कंपनी आगामी तीन वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी १० कोटी रुपये प्रदान करणार आहे. कंपनीने मार्च २०१५मध्ये एनएसडीएफला १० कोटी रुपयांचा निधी दिला.’ ते पुढे म्हणाले, ‘आतापर्यंत निवड करण्यात आलेल्या ४५ खेळाडूंना २०१६च्या रिओ आॅलिम्पिकपर्यंत देण्यात येणारी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. थाळीफेकपटू विकास गौड, नेमबाज अभिनव बिंद्रा, गगन नारंग, मनजीत संधू व संजीव राजपूत यांना रिओ आॅलिम्पिकपर्यंत १ कोटी १२ लाख रुपये प्रदान करण्यात येणार आहेत. बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, पी. कश्यप आणि के. श्रीकांत यांना प्रत्येकी ९० लाख रुपये देण्यात येतील. बॉक्सर मेरीकोम, सरिता देवी, देवेंद्रो सिंग व विजेंदर सिंग, नेमबाज हिना सिद्धू, जीतू राय, पीएन प्रकाश, विजय कुमार, मल्ल सुशील, योगेश्वर व अमित कुमार यांना प्रत्येकी ७५ लाख रुपये देण्यात येतील. बॅडमिंटनपटू आर.एम.व्ही. गुरुसाईदत्त व एच.एस. प्रणय, नेमबाज अयोनिका पॉल, अपूर्वी चंदेला, अंकुर मित्तल, मोहम्मद असाब व क्यानन चेन्नई यांना प्रत्येकी ६० लाख रुपये देण्यात येतील. अन्य १७ खेळाडूंना प्रत्येकी ४५ लाख रुपये देण्यात येतील. (वृत्तसंस्था)
निवड करण्यात आलेले खेळाडू
नेमबाजी : अभिनव बिंद्रा, गगन नारंग, संजीव राजपूत, अयोनिका पॉल, अपूर्वी चंदेला, हिना सिद्धू, श्वेता चौधरी, मलाइका गोयल, जीतू रॉय, पी.एन. प्रकाश, विजय कुमार, राही सरनोबत, अनिसा सैयद, मानवजीत संधू, अंकुर मित्तल, मोहम्मद असाब, क्यानन चेन्नई.
अॅथलेटिक्स विकास गौडा, सीमा अंतिल, अरपिंदर सिंग, खुशबीर कौर व केटी इरफान.
बॅडमिंटन सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, पी. कश्यप, के. श्रीकांत, आरएमव्ही गुरुसाईदत्त व एच.एस. प्रणय.
कुस्ती सुशील कुमार, योगेश्वर दत्त, बजरंग, अमित कुमार, राहुल अवारे, बबिता कुमारी व विनेश फोगाट.
बॉक्सिंग एम.सी. मेरीकोम, सरिता देवी, पिंकी जांगडा, देवेंद्रो सिंग, शिव थापा, मनदीप जांगडा, विजेंदर सिंग, विकास कृष्ण.
सेलिंग वर्षा गौतम व ऐश्वर्य एन.