ट्विटरवरील सामन्यात सचिन तेंडूलकरच्या गोलंदाजीवर सेहवागचा षटकार
By Admin | Updated: October 5, 2016 17:07 IST2016-10-05T16:32:52+5:302016-10-05T17:07:40+5:30
ट्विटरवर सेहवागने सचिन तेंडूलकरलाही सोडलं नाही आणि षटकार ठोकत आपणच ट्विटरचे मास्टर ब्लास्टर असल्याचं सिद्ध केलं

ट्विटरवरील सामन्यात सचिन तेंडूलकरच्या गोलंदाजीवर सेहवागचा षटकार
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - एकेकाळी मैदानावर गोलंदाजांना फटकवणारा विरेंद्र सेहवाग सध्या ट्विटरवर जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे. यावेळी तर त्याच्यासमोर क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर होता. मात्र तरीही विरेंद्र सेहवागने माघार घेतली नाही. सर्वांप्रमाणे सेहवागने सचिन तेंडूलकरलाही सोडलं नाही आणि षटकार ठोकत आपणच ट्विटरचे मास्टर ब्लास्टर असल्याचं सिद्ध केलं.
भारताने दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर सचिन तेंडूलकरने भारतीय संघाचं कौतुक करणारं ट्विट केलं होतं. 'विजयाबद्दल आणि पहिल्या क्रमांकावर आल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन' असं तेंडूलकरने ट्विटमध्ये म्हटलं होतं. नेमकी हीच संधी साधत सामन्यावेळी कॉमेंट्री करणा-या विरेंद्र सेहवागने 'देवा कधीतरी कॉमेंटेटरलाही प्रोत्साहित करत जा' असं ट्विट सचिन तेंडूलकरला केलं.
सचिन तेंडूलकरने लगेच ट्विटला उत्तर देत 'जियो मेरे लाल...तथास्तू' असं लिहिलं होतं. सचिन तेंडूलकरला आपण फुल टॉस टाकला आहे याची कल्पनाही सचिन तेंडूलकरला नव्हती. आणि अपेक्षेप्रमाणे सेहवागने षटकार ठोकला.
काही दिवसांपूर्वीच रिलायन्सने जिओ सीमकार्ड लाँच केलं आहे. तसंच रिलायन्सचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा सचिन तेंडूलकर कप्तान होता. नेमकी हीच संधी सेहवागने साधली आणि उत्तर दिलं. 'आशिर्वाद देतानाही आपल्या मालकाच्या ब्रँण्डचा (जिओ) उल्लेख करणं विसरत नाही' असं ट्विट करत सेहवागने सचिनला निरुत्तर करुन टाकलं.