दुसऱ्या दिवशी भारताचे वर्चस्व, १४२ धावांची आघाडी
By Admin | Updated: November 6, 2015 17:24 IST2015-11-06T17:06:00+5:302015-11-06T17:24:14+5:30
चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर भारताने मोहाली कसोटीत दुसऱ्या डावात १४२ धावांची आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या दिवशी भारताचे वर्चस्व, १४२ धावांची आघाडी
ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. ६ - चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ६३ धावांच्या जोरावर भारताने मोहाली कसोटीत दुसऱ्या डावात १४२ धावांची आघाडी घेतली आहे. मोहाली कसोटीच्या दुस-या दिवशी आर. अश्विन (५ ), रवींद्र जडेजा(३) आणि अमित मिश्राच्या (२) घातक गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेस १८४ धावात गुंडाळले. त्यांतर दुसऱ्या डावात पुजारा(६३) आणि मुरली विजयच्या (४७)संयमी खेळीच्या जोरावर दुसऱ्या दिवशी भारताने आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले. शिखर धवन (०) दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाला. सध्या कर्णधार विराट कोहली (११) आणि चेतेश्वर पुजारा(६३) मैदानावर आहेत. आफ्रिकेतर्फे ताहिर आणि फिलींडरने एक एक बळी मिळवला.
मोहाली कसोटीच्या दुस-या दिवशी आफ्रिकेने २ बाद २८ वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. डिन एल्गार आणि हाशिम आमला या जोडीने सावध सुरुवात करत आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एल्गार ३७ धावांवर असताना अश्विनच्या फिरकीवर तो झेलबाद झाला. तर अश्विनने हाशिम आमलाचा अडसर दूर करत भारताला मोठे यश मिळवून दिले. हामला ४३ धावांवर बाद झाला. यानंतर डेन विलासला स्वस्तात माघारी पाठवण्यात अश्विनला यश आले. लंचपर्यंत आफ्रिकेचा निम्मा संघ तंबूत परतला.
त्यानंतरहीआफ्रिकेची पडझड सुरूच होती, मात्र एबी डीव्हिलयर्स खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर आफ्रिकेने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. एकीकडे अश्विनच्या गोलंदाजीमुळे आफ्रिकेचे फलंदाज बेजार झालेले असतानाच जडेजा आणि मिश्रानेही पटापट बळी मिळवल्याने आफ्रिकेचा डाव १८४ धावांत संपुष्टात आला.