सतपालना पद्मभूषण
By Admin | Updated: January 26, 2015 03:05 IST2015-01-26T03:05:57+5:302015-01-26T03:05:57+5:30
देशातील सर्वश्रेष्ठ कुस्ती गुरु महाबली सतपाल यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे,

सतपालना पद्मभूषण
नवी दिल्ली : देशातील सर्वश्रेष्ठ कुस्ती गुरु महाबली सतपाल यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे, परंतु आॅलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार आणि सायना नेहवाल यांना पद्म पुरस्कारासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.
सरकारने रविवारी संध्याकाळी पद्म पुरस्काराची घोषणा केली. आॅलिम्पिक पदक विजेत्या सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त यांचे गुरु सतपाल यांना पद्मभूषण, तर, हॉकीपटू सरदारसिंग, बॅडमिंटनस्टार पी व्ही सिंधू, क्रिकेटपटू मिताली राज, यांच्यासोबत सबा अंजुम आणि अरुनिमा सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतीय कुस्तीला नवी ओळख देणाऱ्या आणि देशाला आॅलिम्पिक पदक विजेते पैलवान देणाऱ्या महाबली सतपाल यांनी आपले पूर्ण जीवन कुस्तीसाठी समर्पित केले आहे. आजमितीला ते देशातील पहिल्या क्रमांकाचे कुस्ती गुरु म्हणून ओळखले जातात. भारतीय कुस्तीचे पितामह गुरु हनुमान यांचे शिष्य असलेल्या सतपाल यांनी १९८२ च्या नवीदिल्ली आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत तीनवेळा रौप्यपदक जिंकणाऱ्या सतपाल यांनी आशियाई स्पर्धेचे रौप्य आणि कांस्यपदकही जिंकले आहे.
बिजिंग २00८ आणि लंडन २0१२च्या आॅलिम्पिकमध्ये अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक जिंकणारा मल्ल सुशीलकुमार आणि लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा अशी शिफारस क्रीडा मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडे केली होती, परंतु त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले नाही.
क्रीडा मंत्रालयाने सुशीलचे नाव अगोदर पाठविले होते, त्यावर सायनाने आक्षेप घेत आपलाही या पुरस्कारासाठी विचार व्हावा अशी मागणी केली होती. क्रीडा खात्याने नंतर तिच्याही नावाचा प्रस्ताव पाठविला होता. यावेळी क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आम्ही फक्त शिफारस करण्याचे काम करतो, अंतिम निर्णय गृहमंत्रालयच घेत असते, असे म्हटले होते. यातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता होती. पण आता या दोघांनाही पद्मभूषणसाठी पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे.