सतीश उपांत्य फेरीत
By Admin | Updated: September 2, 2015 23:42 IST2015-09-02T23:42:23+5:302015-09-02T23:42:23+5:30
सतीश कुमार (९१ किलो) याने आज आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारताना आपला पदकाचा दावा मजबूत केला

सतीश उपांत्य फेरीत
बँकॉक : सतीश कुमार (९१ किलो) याने आज आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारताना आपला पदकाचा दावा मजबूत केला. त्याचबरोबर त्याने जागतिक स्पर्धेचे तिकीटही पक्के केले. परंतु, अन्य दोन भारतीय खेळाडूंना पराभव पत्करावा लागला.
दिवसाच्या सुरुवातीला मदनलाल (५२ किलो) आणि कुलदीपसिंह (८१ किलो) यांच्या पराभवाने निराश झाल्यानंतर सतीशने ताजिकिस्तानच्या सियोवुश जुखुरोव्ह याला पराभूत करीत भारतीय गोटात आनंदाचे वातावरण निर्माण केले.
सतीशला तांत्रिक नॉकआऊटद्वारे विजयी घोषित करण्यात आले. त्याच्या प्रतिस्पर्ध्याला जास्त वेळेस झुकण्यामुळे दोनदा इशारा दिला होता. याशिवाय तो भारतीय मुष्टियोद्ध्याचे ठोशेदेखील सहन करण्यात अपयशी ठरला.
उद्या विश्रांतीनंतर सतीश उपांत्य फेरीत चीनच्या द्वितीय मानांकित वांग झिबाओशी दोन हात करेल. तथापि, मदनलाल आणि कुलदीपचे आव्हान संपुष्टात आल्याने भारताच्या हाती निराशा लागली.
राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबख्श सिंह म्हणाले, ‘‘सतीशने आज पूर्णपणे वर्चस्व ठेवले आणि रेफरीला तिसऱ्या फेरीतच लढत थांबवावी लागली. कारण ताजिक बॉक्सर प्रहार सहन करू शकत नव्हता आणि तो जास्त झुकत होता.’’
भारताकडून सर्वांत आधी मदनलाल रिंगमध्ये उतरला आणि त्याच्यासमोर उझबेकिस्तानचा द्वितीय मानांकित शखोबिदीन जोइरोव्ह होता. भारतीय खेळाडूसाठी स्थिती प्रतिकूल होती आणि ही लढत अगदीच एकतर्फी ठरली.
उझबेकिस्तानच्या मुष्टियोद्ध्याने आपल्या शक्तिशाली ठोशांचे जबरदस्त प्रहार केले. ज्याचे उत्तर हरियाणाच्या खेळाडूकडे नव्हते. उझबेकिस्तानच्या मुष्टियोद्ध्याने ही लढत ३-0 अशी जिंकली. पुढची लढत कुलदीप आणि कोरियन किम ह्युंगोक्यू यांच्यात होती. त्यात भारतीय मुष्टियोद्ध्याला १-२ असा पराभवाचा सामना करावा लागला.
आजच्या निकालानंतर भारताचे एकूण चार खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. एल देवेंद्रोसिंह (४९ किलो), शिव थापा (५६ किलो) आणि विकास कृष्ण (७५ किलो) यांनी आपले पदक आधीच निश्चित केले असून, त्यांनी आॅक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक स्पर्धेतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. शिव उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या मुरोदजोन अखमादालीव्हशी दोन हात करेल, तर देवेंद्रोचा सामना अव्वल मानांकित उझबेकी मुष्टियोद्धा हसनबाय दुस्मातोव्हशी होईल. विकास उपांत्य फेरीत इराकच्या वाहिद अब्दुलरिदा याचा सामना करेल.
संधू म्हणाले, ‘‘मी खेळाडूंच्या कामगिरीने खूश असून, चार जण उपांत्य फेरीत पोहोचणे ही चांगली कामगिरी आहे. ते आणखी चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.’’
दोहा येथे होणारी जागतिक स्पर्धा ही रियो आॅलिम्पिकसाठी पहिली क्वालिफाइंग स्पर्धा आहे.