सरिता देवीने नकारले कांस्य पदक
By Admin | Updated: October 1, 2014 18:16 IST2014-10-01T17:32:18+5:302014-10-01T18:16:44+5:30
सरिता देवी हिला ३ -० असे पराभूत करण्याचा निर्णय पूर्वीच ठरला असल्याचे तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले आहे.

सरिता देवीने नकारले कांस्य पदक
ऑनलाइन लोकमत
इंचियोन, दि. १ - पंचाच्या पक्षपातीपणाचा फटका बसलेली भारताची बॉक्सिंगपटू सरिता देवीने कांस्य पदक स्वीकारण्यास नकार देत पंचाच्या निर्णयाचा निषेध दर्शवला आहे. सरिताच्या या कृत्यामुळे तिच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असून सरितानेही याचे परिणाम भोगण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमधील ६० किलो वजनी गटातील उपांत्यफेरीतील अंतिम लढतीत सरिताने सलग मुक्के मारत जिना पार्क या कोरियन बॉक्सरला सळो की पळो करुन सोडले होते, परंतू, असे असतानाही पंचांच्या निकालाने तिला धक्का बसला. तसेच या निर्णयाचा निषेध नोंदवत तिने कांस्यपदक स्विकारण्यास नकार दिला आहे. हे पदक आयोजकांच्या ताब्यात आहे. यावर सरिता म्हणाली, माझ्यावरच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. अश्रु अनावर झाल्याने तिने व्यासपीठावरून काढता पाय घेतला. भारतीय व्यवस्थापकांकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने तिने नाराजी व्यक्त केली असून आपल्या कृत्याचे परिणाम भोगण्याची तिने तयारी दर्शवली आहे. यापूर्वीही १९८८ मध्ये ऑलिंम्पिक स्पर्धेत असा पक्षपातीपणा झाला असल्याचे तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले आहे.