सानियाच्या पदरी निराशा, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपद
By Admin | Updated: January 29, 2017 12:06 IST2017-01-29T11:46:14+5:302017-01-29T12:06:23+5:30
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियाचा सहकारी इवान डोडिग यांचा आॉस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभव

सानियाच्या पदरी निराशा, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपद
ऑनलाइन लोकमत
मेलबोर्न, दि. 29 - ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या पदरी निराशा पडली आहे. सानिया आणि तिचा क्रोएशियाचा सहकारी इवान डोडिग या दुसऱ्या मानांकित जोडीला आॉस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या एबिगेल स्पियर्स व कोलंबियाच्या युआन सबेस्टियन कबाल या बिगरमानांकित जोडीने त्यांचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-4 असा पराभव केला.
सामन्याच्या सुरूवातीपासूनच स्पियर्स आणि कबाल जोडीने आक्रमक खेळ केला आणि सानिया-डोडिग जोडीला लय मिळवणं कठीण गेलं. केवळ 26 मिनिटात सानिया-डोडीग जोडीने पहिला सेट 6-2 असा गमावला. दुस-या सेटमध्ये दोघांनी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्पियर्स आणि कबाल जोडीने वर्चस्व गाजवत 6-4 असा दुसरा सेट जिंकला आणि ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं.
सानिया व डोडिगने गेल्या वर्षीही फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण लिएंडर पेस व मार्टिना हिंगीस यांच्याविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.