टेनिसमध्ये सानिया, रोहणकडून पदकाची अपेक्षा
By Admin | Updated: August 5, 2016 20:21 IST2016-08-05T20:21:59+5:302016-08-05T20:21:59+5:30
रिओ आॅलिम्पिकपूर्वी लियांडर पेसबाबत झालेल्या वादामुळे भारतीय टेनिस चर्चेत राहिले. पण या खेळात रिओमध्ये सानिया मिर्झा- रोहण बोपन्ना यांच्या मिश्र दुहेरी जोडीकडून पदकाची अपेक्षा आहे.

टेनिसमध्ये सानिया, रोहणकडून पदकाची अपेक्षा
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ५ : रिओ आॅलिम्पिकपूर्वी लियांडर पेसबाबत झालेल्या वादामुळे भारतीय टेनिस चर्चेत राहिले. पण या खेळात रिओमध्ये सानिया मिर्झा- रोहण बोपन्ना यांच्या मिश्र दुहेरी जोडीकडून पदकाची अपेक्षा आहे. लंडन आॅलिम्पिकआधी
असेच मानापमान नाट्य गाजले. रिओपूर्वी त्याची पुनरावृती झाली. पेस आणि त्याचा दुहेरीचा जोडीदार बोपन्ना यांच्यातील मतभेद बरेच गाजले.
बोपन्नाने आधी पेस नव्हे तर साकेत मिनेनी याच्यासोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण अ.भा. टेनिस महासंघाने वेळीच दखल घेत दोघांमध्ये समेट घडवून आणला. पेसने क्रीडाग्राममध्ये बोपन्नासोबत एका खोलीत थांबण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. सलग सातवे आॅलिम्पिक खेळत असलेला पेस गुरुवारी येथे दाखल झाला. त्याच्यासाठी कुठलीच खोली नव्हती. नंतर
त्याला खोली उपलब्ध करून देण्यात आली. पथकप्रमुख राकेश गुप्ता यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले की, पेस एकटाच थांबणार होता.
कुठलाही वाद नाही. ज्येष्ठ खेळाडू या नात्याने वेगळी खोली त्याला मिळायलाच हवी. पेस उशिरा पोहोचल्यामुळे बोपन्नाने सर्बियाचा नेनाद जिमोजिच याच्यासोबत सराव केला. नंतर त्याने सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे यांच्यासोबतही सरावाचा आनंद लुटला.
भारतासाठी पेसने अटलांटा आॅलिम्पिकमध्ये १९९६ मध्ये कांस्य जिंकले होते. तेव्हापासून या खेळात भारताच्या पदकांची झोळी रिकामीच आहे. पेस- बोपन्ना यांचा पहिल्या फेरीत सामना पोलंडची जोडी मार्टिन मॅटकोव्हस्की- लुकास कुबोट यांच्याविरुद्ध होईल. पेस दुहेरी क्रमवारीत ५० च्या खाली घसरला आहे. भारताला दुहेरीत येथे १५ वे रँकिंग मिळाले. मिश्र प्रकारात भारताला पदकाची आशा आहे. महिला दुहेरीत सानिया- प्रार्थना यांना सलामीला चीनची जोडी पेंग शुआइ- शुआइ झांग यांच्याविरुद्ध लढत द्यायची आहे.