सानिया मिर्झाने ‘जोको’ला टाकले मागे
By Admin | Updated: November 3, 2015 03:58 IST2015-11-03T03:58:00+5:302015-11-03T03:58:00+5:30
विश्व टेनिस क्रमवारीतील दुहेरीची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने २०१५ मध्ये जेतेपदाबाबत पुरुष क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविच याला मागे टाकले आहे.

सानिया मिर्झाने ‘जोको’ला टाकले मागे
नवी दिल्ली : विश्व टेनिस क्रमवारीतील दुहेरीची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हिने २०१५ मध्ये जेतेपदाबाबत पुरुष क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोवाक जोकोविच याला मागे टाकले आहे.
सानियाने जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीससोबत रविवारी सिंगापूरमध्ये वर्षातील अखेरची डब्ल्यूटीए फायनल जिंकली. या जेतेपदानंतर तिने जोकोविचला मागे टाकले. सानियाचे हिंगीससोबत वर्षभरात नववे आणि वैयक्तिक जेतेपद होते. शिवाय डब्ल्यूटीए विजेतेपदही कायम राखले आहे. गतवर्षी तिने झिम्बाब्वेची कारा ब्लॅक हिच्यासोबत ही स्पर्धा जिंकली होती. जोकोविच एका वर्षांत नऊ जेतेपदाचा मानकरी ठरला होता. जोकोविचला अद्यापही सानियाला मागे टाकण्याची संधी आहे. तो पॅरिस मास्टर्स आणि लंडनमधील एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स जिंकून पुढे जाऊ शकतो.
सानियाने यंदा मार्च महिन्यात इंडियन वेल्समध्ये हिंगीससोबत पहिले जेतेपद पटकविले होते.सानिया-हिंगीस जोडी गेल्या २२ सामन्यांत अपराजित राहिली. या काळात केवळ दोनच सेट गमावले. (वृत्तसंस्था)
सानिया-हिंगीस वर्षाचा शेवट नंबर एक जोडी म्हणून करणार असून, जोकोविचदेखील वर्षांची अखेर अव्वल नंबर खेळाडू म्हणूनच करेल.
सानियाचे दुहेरीत ११३५५ गुण आहेत. सेरेनाचे ९९४५ आणि जोकोविचचे १५७८५ गुण आहेत. रँकिंग गुणांवर नजर टाकल्यास जागतिक टेनिसमध्ये सानियाच्या पुढे केवळ जोकविच आहे.
दोघी रोम ओपनमध्ये उपविजेत्या होत्या. सानियाने एकीकडे वर्षांतील दहावे तर हिंगीसने ५० वे डब्ल्यूटीए जेतेपद मिळविले. ही कामगिरी करणारी जगातील ती १६ वी खेळाडू आहे. सानियाला यंदा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
जोकोविचने आतापर्यंत तीन ग्रॅण्डस्लॅमसह नऊ जेतेपद पटकविली आहेत. त्यात आॅस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपनशिवाय इंडियन वेल्स, मियामी, माँटे कार्लो आणि रोम एटीपी मास्टर्स १००० चा देखील समावेश आहे. चायना ओपन आणि शांघाय मास्टर्स या दोन स्पर्धेतही जोकोविचने चमक दाखविली.