सानिया-हिंगीस यांची विजयी सुरुवात
By Admin | Updated: September 4, 2015 23:06 IST2015-09-04T23:06:02+5:302015-09-04T23:06:02+5:30
अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने वर्षाच्या अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये अमेरिकेच्या कॅटलिन क्रिस्टन आणि सबरीना संतामारिया

सानिया-हिंगीस यांची विजयी सुरुवात
न्यूयॉर्क : अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या जोडीने वर्षाच्या अखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपनमध्ये अमेरिकेच्या कॅटलिन क्रिस्टन आणि सबरीना संतामारिया या जोडीचा पराभव करताना विजयाने जोरदार सुरुवात केली. दरम्यान, भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस आणि त्याचा स्पेनचा जोडीदार वर्दास्को यांनीही आपली आगेकूच कायम ठेवली.
या वर्षीच्या विम्बल्डन विजेत्या सानिया आणि हिंगीस या इंडो-स्वीस जोडीने ५६ मिनिटे रंगलेल्या लढतीत अमेरिकेच्या जोडीचे ६-१, ६-२ असे सरळ सेट्समध्ये आव्हान संपुष्टात आणले. विजयी जोडीने एक बिनतोड सर्व्हिस आणि एक विनर्स मारताना एकूण ६१ गुण घेतले, तर कॅटलिन आणि सबरिना जोडीने एकूण ३३ गुण प्राप्त केले. सानिया-हिंगीस यांची पुढील फेरीतील लढत टिमिया बोज्नियाकी आणि चिया जुंग चुआंग यांच्याशी होईल.
पुरुष दुहेरीतही भारताच्या लिएंडर पेस याने त्याचा स्पेनचा जोडीदार वर्दास्कोच्या साथीने जर्मनीच्या फ्लोरिन मेयर आणि फ्रँक मोजर जोडीचा ४२ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-२, ६-३ असा पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. पेस आणि वर्डास्को यांनी दोन वेळेस ब्रेक पॉइंट वाचवले आणि त्यादरम्यान
त्यांनी जे ब्रेक पॉइंट मिळवले
त्यात तीन वेळा त्यांना यश
मिळाले. त्याआधी पेसने
मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीत आधीच विजयाने सुरुवात केली.
आता पेस-वर्दास्को यांचा सामना अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सन आणि सॅम कुएरी या जोडीशी होईल. स्टीव्ह जॉन्सन आणि सॅम कुएरी या जोडीने त्यांच्याच देशाच्या माईक आणि बॉब ब्रायन या अव्वल मानांकित जोडीवर ७-६, ५-७, ६-३ असा सनसनाटी विजय मिळवला. (वृत्तसंस्था)