सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत
By Admin | Updated: October 9, 2015 04:41 IST2015-10-09T04:41:21+5:302015-10-09T04:41:21+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस यांनी आपली विजयी मालिका कायम ठेवताना गुरुवारी येथे ५७ लाख डॉलर

सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत
बीजिंग : जागतिक क्रमवारीतील नंबर वन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस यांनी आपली विजयी मालिका कायम ठेवताना गुरुवारी येथे ५७ लाख डॉलर बक्षीस रकमेच्या चायना ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
सानिया व हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जिस व झेक प्रजासत्ताकाची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांचा एक
तास २० मिनिटे रंगलेल्या लढतीत
७-४, ६-४ असा पराभव करून सेमीफायनलमध्ये धडक मारली.
बीजिंग आॅलिम्पिक ग्रीन टेनिस सेंटरवर झालेल्या या लढतीत दोन्ही जोड्यांदरम्यान पहिला सेट खूप चुरशीचा ठरला. त्यात दोन्ही प्रतिस्पर्धी जोड्यांनी मिळालेल्या पाच संधींपैकी त्याचे प्रत्येकी २ वेळा गुणांमध्ये रूपांतर केले. सेट टायब्रेकमध्ये पोहोचला. त्यात सानिया-हिंगीस यांनी ७-५ असा विजय मिळविला.
दुसऱ्या सेटमध्ये ज्युलिया आणि कॅरोलिना यांनी पुन्हा कडवी झुंज देताना सानिया-हिंगीस यांची सर्व्हिस भेदली; परंतु अव्वल मानांकित जोडीने पुन्हा मुसंडी मारताना जर्मन-झेक जोडीची दोन वेळा सर्व्हिस भेदून सेट आणि सामनाही जिंकला. या वर्षी दोन ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या नंबर वन जोडीने या सामन्यात ११ पैकी ४ ब्रेकपॉइंट जिंकले. त्यांनी पहिल्या सर्व्हिसवर ७६ टक्के गुण जिंकले. एकदा बिनतोड सर्व्हिसदेखील केली.
त्याआधी पुरुष दुहेरीत अनुभवी लिएंडर पेस आणि देशातील नंबर वन एकेरीतील खेळाडू रोहन बोपन्ना यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)