सानिया-बोपण्णा विजयी
By Admin | Updated: December 8, 2015 02:19 IST2015-12-08T02:19:19+5:302015-12-08T02:19:19+5:30
गतविजेत्या इंडियन एसेसने भारताचे सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या खेळाडूंच्या विजयासोबतच आयटीपीएलच्या दुसऱ्या सत्रात दुबई रॉयल्सचा ३०-१८ ने पराभूत केले.

सानिया-बोपण्णा विजयी
मनिला : गतविजेत्या इंडियन एसेसने भारताचे सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या खेळाडूंच्या विजयासोबतच आयटीपीएलच्या दुसऱ्या सत्रात दुबई रॉयल्सचा ३०-१८ ने पराभूत केले.
इंडियन एसेसचा हा विजय नक्कीच विशेष राहिला. संघाने सर्वच सामन्यांत विजय मिळवला. दुहेरीतील जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू सानिया मिर्झा आणि तिचा जोडीदार रोहन बोपण्णाने युएरी रॉयल्सच्या डेनियल नेस्टर आणि क्रिस्टीना म्लादेनोविच यांचा ६-४ असा पराभव केला, तर महिला एकेरीत समांथा स्तोसुर हिने क्रिस्टीना हिचा ६-३ असा पराभव केला.
लिजेंड एकेरी सामन्यात फ्रान्सच्या ४२ वर्षांच्या फॅब्रिस सांतोरो याने क्रोएशियाच्या ४४ वर्षांच्या गोरान इवानिसेविकच्या आव्हानाचा पार धुव्वा उडवला. हा सामना ६ -३ असा जिंकला. स्पेनच्या राफेल नदाल आणि इवान डोडिगच्या जोडीने डॅनिएल नेस्टर आणि टॉमस बेर्दिचला ६-३ ने पराभूत करत विजय मिळवला. स्टार खेळाडू नदाल याने पुरुष एकेरीत बेर्दिचला ६-५ ने पराभूत केले. हा सामना नदालने टायब्रेकरमध्ये जिंकला.
पुनरागमन करण्यास तयार : सेरेना
वर्षाच्या शेवटी यूएस ओपनदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे टेनिसपासून दूर गेलेली सेरेना विल्यम्स पुनरागमनासाठी तयार आहे. सेरेनानेच याबाबतची माहिती दिली.
इटलीच्या रॉबर्टा विन्सीसोबत झालेल्या लढतीत सेरेना जखमी झाली होती. त्यानंतर ती खेळापासून दूर गेली. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. तसेच व्यावसायिक खेळात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.
सेरेना पुनरागमनानंतर इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगमध्ये फ्रॅँचायझी संघ फिलिपिन्स मैवरिक्सकडून सहभागी होईल. सेरेना म्हणाली, की ती पुनरागमनामुळे आनंदी असून, लवकर लय परत मिळवेल.’’
२१ ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱ्या सेरेना म्हणाली, की यू. एस.ओपनमध्ये झालेल्या पराभवामुळे कोर्टपासून दूर नव्हते, तर जखमेमुळे दूर राहिले होते. मी सातत्याने खेळत होते. त्यामुळे गुडघ्यात वेदना होत होत्या.