समीर वर्मा, सायली राणे अंतिम फेरीत
By Admin | Updated: November 8, 2015 03:10 IST2015-11-08T03:10:59+5:302015-11-08T03:10:59+5:30
भारतीय युवा बॅडमिंटन खेळाडू समीर वर्मा आणि सायली राणे यांनी बहरीन इंटरनॅशनल चॅलेंजच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली.

समीर वर्मा, सायली राणे अंतिम फेरीत
नवी दिल्ली : भारतीय युवा बॅडमिंटन खेळाडू समीर वर्मा आणि सायली राणे यांनी बहरीन इंटरनॅशनल चॅलेंजच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली.
समीरने गेल्या रविवारी बहरीन इंटरनॅशनल सिरीज पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले होते, तर सायलीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या दोघांनी या स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. समीरने राहुल यादवचा २१-१३, २१-१७ असा पराभव केला, तर सायलीने इंडोनेशियाच्या गॅब्रियला एम. हिच्यावर १९-२१, २१-१३, २१-१३ असा उपांत्य फेरीत विजय मिळविला.
११ व्या मानांकित समीरचा सामना आता चौथ्या मानांकित सिंगापूरच्या जी लियांग डेरेक वोंग याच्याशी होईल, तर सायली पाचव्या मानांकित एन. जिंदापोल याच्याविरुद्ध दोन हात करील. अन्य भारतीय खेळाडूंत अरुण विष्णू आणि अपर्णा बालन यांना अव्वल मानांकित सिंगापूरच्या डॅनी बावा क्रिसनांटा आणि यू यान वेनेसा नियो यांनी २१-१६, २१-१९ असे पराभूत केले, तर महिला दुहेरीत मनीषा आणि एन. सिक्की रेड्डी यांना थायलंडच्या चलादचालम सी. आणि फाटाइमास एम. कडून २१-१५, २१-१५ अशी मात खावी लागली.