सायनाच आहे पदकाचे प्रबळ दावेदार
By Admin | Updated: July 20, 2016 20:48 IST2016-07-20T20:48:29+5:302016-07-20T20:48:29+5:30
रिओ आॅलिम्पिकमध्ये आपले सात खेळाडू बॅडमिंटनसाठी खेळणार आहेत, ही भारतासाठी खूप चांगली बाब आहे. सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून भारताची अव्वल खेळाडू सायना

सायनाच आहे पदकाचे प्रबळ दावेदार
पी. गोपिचंद : संपुर्ण संघाकडून पदकाची आशा
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये आपले सात खेळाडू बॅडमिंटनसाठी खेळणार आहेत, ही भारतासाठी खूप चांगली बाब आहे. सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असून भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवाल पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असेल, असे राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपिचंद यांनी सांगितले.
येथे झालेल्या एका कार्यक्रमात गोपिचंद यांनी रिओ ओलिम्पिकमधील भारतीयांच्या तयारीविषयी सांगितले. रिओसाठी पात्रता मिळवलेल्या सर्व खेळाडूंकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. मागील काही महिन्यांपासून आपल्या खेळाडूंचा खेळ शानदार झाला आहे. माझ्यामते आपल्या संपुर्ण संघाकडून पदकाची आशा आहे, असा विश्वास गोपिचंद यांनी यावेळी व्यक्त केला.
सायनाविषयी गोपिचंद यांनी सांगितले की, पदक मिळवण्याबाबत नक्कीच सायनाकडून सर्वाधिक अपेक्षा आहेत. नुकताच तीने आॅस्टे्रलियन ओपनमध्ये सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. जागतिक क्रमवारीत ती पाचव्या स्थानी असून सध्या जबरदस्त फार्ममध्ये आहे. गेल्या ओलिम्पिकमध्ये तीने पदक जिंकले होते आणि यावेळीही तीच्यामध्ये पदक जिंकण्याची क्षमता आहे. त्याचवेळी गोपिचंद यांनी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य विजेती जोडी ज्वाला गुट्टा - अश्विनी पोनप्पा आणि अव्वल पुरुष एकेरी खेळाडू किदाम्बी श्रीकांत यांच्याकडूनही पदकासाठी दावेदार मानले आहे.
त्याचप्रमाणे स्पर्धेतील इतर देशांच्या कामगिरीविषयी गोपिचंद म्हणाले की, यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणे कोणत्याही देशाला सोपे नसणार. मागील काही स्पर्धांवर नजर टाकल्यास कळेल की, एकाच देशाचे सलग वर्चस्व राहिलेले नाही. प्रत्येक वेळी नवीन विजेते मिळाल्याने यंदाची स्पर्धा अधिक आव्हानात्मक असेल. त्यामुळेच सातत्यपुर्ण कामगिरी करणारा खेळाडूच यशस्वी होईल. (वृत्तसंस्था)
जर तुम्ही खरंच पदक मिळवण्याचे लक्ष्य बाळगले असेल तर स्पर्धेचा ड्रॉ काय असेल यावर फरक नाही पडणार. मग भलेही सुरुवातीचे किंवा बाद फेरीचे सामने खराब जातील. यामुळे मी याकडे जास्त लक्ष देत नाही. माझ्यामते आॅलिम्पिकमध्ये होणाऱ्या दबावाखाली सलग दोन सामने जिंकून पदक जिंकणे शक्य आहे. कधी काय होईल ते सांगता येणार नाही.
- पुलेल्ला गोपिचंद