सायना, श्रीकांत कामगिरी उंचावण्यासाठी खेळणार
By Admin | Updated: November 9, 2015 23:37 IST2015-11-09T23:37:12+5:302015-11-09T23:37:12+5:30
सायना नेहवाल आणि श्रीकांत यांना चांगल्या कामगिरीसाठी संघर्ष करावा लागत आहे; परंतु उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या सात लाख डॉलर बक्षीस रकमेच्या चायना ओपन सुपर

सायना, श्रीकांत कामगिरी उंचावण्यासाठी खेळणार
फुजोऊ : सायना नेहवाल आणि श्रीकांत यांना चांगल्या कामगिरीसाठी संघर्ष करावा लागत आहे; परंतु उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या सात लाख डॉलर बक्षीस रकमेच्या चायना ओपन सुपर सिरीज प्रीमियरमध्ये ते कामगिरीचा आलेख उंचावण्याच्या निर्धाराने खेळणार आहेत. गत स्पर्धेत हे दोघेही विजेते ठरले आहेत. सायना आजारपणामुळे जपान, डेन्मार्क आणि फ्रान्स सुपर सिरीजमध्ये चांगली कामगिरी करू शकली नाही.
अव्वल मानांकित सायनाचा सामना चीनच्या सुन यू हिच्याविरुद्ध होईल. या चिनी खेळाडूविरुद्ध सायनाचा रेकॉर्ड ४-१ असा आहे; परंतु तिला एकदा चायना ओपनमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
पुरुष एकेरीत श्रीकांत दुखापत आणि खराब फॉर्मशी झुंजत आहे. दुखापतीमुळे त्याने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतला नाही आणि जपान, कोरिया, डेन्मार्क व फ्रान्समध्ये त्याचे आव्हान लवकर संपुष्टात आले. पाचव्या मानांकित श्रीकांत हाँगकाँगच्या हू यूनविरुद्ध खेळेल. त्याच्याविरुद्ध त्याचा रेकॉर्ड २-१ असा आहे.
महिला एकेरीत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळेसची कांस्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू पहिल्या फेरीत रशियाच्या सेनिया पोलिकारपोव्हाविरुद्ध खेळेल. अन्य भारतीयांत पारुपल्ली कश्यप दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, तर एच. एस. प्रणय व अजय जयराम यांचा चांगली कामगिरी करण्याकडे कल असेल. फ्रेंच ओपनमध्ये दोन वेळेसचा आॅलिम्पिक चॅम्पियन लिन डॅनला पराभूत करणारा प्रणय पहिल्या फेरीत क्वालिफायरविरुद्ध दोन हात करील, तर कोरिया ओपनमध्ये उपविजेता आणि डच ओपनमधील चॅम्पियन जयरामचा सामना चीनच्या अव्वल मानांकित चेन लोंग याच्याशी होईल. (वृत्तसंस्था)