सायना, श्रीकांत सुसाट
By Admin | Updated: November 21, 2014 00:34 IST2014-11-21T00:34:01+5:302014-11-21T00:34:01+5:30
स्पर्धेत तृतीय मानांकनप्राप्त सायनाने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले

सायना, श्रीकांत सुसाट
कोलून : भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल व युवा खेळाडू के़ श्रीकांत यांनी हाँगकाँग बॅडमिंटन सुपर सिरीजमध्ये आपले विजयी अभियान कायम राखताना प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र, पी़ व्ही़ सिंधूला स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला़
स्पर्धेत तृतीय मानांकनप्राप्त सायनाने महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि अमेरिकेच्या बीवेन झांग हिचा अवघ्या ३१ मिनिटांत २१-१६ व २१-१३ अशा फरकाने फडशा पाडून थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ ताज्या जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये सायना नेहवाल हिने एका क्रमांकाने झेप घेतली आहे़ ती आता चौथ्या क्रमांकावर विराजमान झाली आहे़
पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात भारताच्या के़ श्रीकांतने कामगिरीत सातत्य राखताना थायलंडच्या तानोगसाक साईनसोमबुनसूकला ३९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत २१-१९, २३-२१ अशी धूळ चारली आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली़
या स्पर्धेत विजेतेपदाची प्रबळ दावेदार असणाऱ्या भारताच्या पी़ व्ही़ सिंधूवर मात्र दुसऱ्याच फेरीत गाशा गुंडाळण्याची वेळ आली़ तिला बिगरमानांकित जपानच्या नोजुमी ओकुहाराकडून २१-१७, १३-२१, २१-११ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला़ त्याआधी आॅलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायनाने जबरदस्त कामगिरी करताना दुसऱ्या फेरीत एकतर्फी विजय मिळविला़ सिंधूला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे आता सायनाकडून जेतेपदाची अपेक्षा आहे़ सायनाला आता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चिनी-तैपेईच्या ताई जु यिंगचा सामना करावा लागेल़
त्याआधी भारताच्या मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी यांना पुरुष दुहेरी गटात पराभवाचा सामना करावा लागला. तर, महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा व एकेरीत आर. एम. व्ही. गुरुसाई दत्त, पी़ कश्यप, अजय जयराम यांना प्रतिस्पर्धी खेळाडूंनी धूळ चारून स्पर्धेबाहेर केले़ (वृत्तसंस्था)