सायना, श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: November 19, 2014 23:47 IST2014-11-19T23:47:56+5:302014-11-19T23:47:56+5:30
: नुकताच चायना ओपनचा किताब आपल्या नावे करणारी भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवाल आणि के़ श्रीकांत यांनी हाँगकाँग ओपन बॅडमिंटनची उप उपांत्यपुर्व फेरी गाठली़

सायना, श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत
हाँगकाँग : नुकताच चायना ओपनचा किताब आपल्या नावे करणारी भारताची अव्वल खेळाडू सायना नेहवाल आणि के़ श्रीकांत यांनी हाँगकाँग ओपन बॅडमिंटनची उप उपांत्यपुर्व फेरी गाठली़ महिला गटातील एकेरीत भारताच्या पी़व्ही़ सिंधू हिने प्रतिस्पर्धी खेळाडूला पराभूत करीत आगेकूच केली़ मात्र महिला दुहेरीत भारताच्या ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा यांना पराभवाचा सामना करावा लागला़
अनुभवी सायनाने आपला फॉर्म कायम राखताना एकेरी सामन्यात अमेरिकेच्या जेमी सुबांधी हिचा अवघ्या २७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या लढतीत २१-१७, २१-११ असा पराभव करीत पुढची फेरी गाठली़ पुरुष गटात श्रीकांत याने एकेरी लढतीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना सातवे मानांकन प्राप्त चीनी तैपेईच्या चोउ तिएन चेनवर १८-२१, २२-२०, २१-१६ अशा फरकाने विजय मिळवित थाटात पुढच्या फेरीत प्रवेश केला़
महिला गटात पी़व्हि सिंधू हिने आक्रमक खेळ करीत केवळ ५२ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात थायलंडच्या बुसानन ओंगबुमरूंगपानला २१-१५, १६-२१, २१-१९ अशा फरकाने पराभूत केले़ पुरूष गटातील अन्य लढतीत मात्र भारताच्या अयज जयरामला पराभवाचे तोंड पहावे लागले़ जयराम चीनच्या चेंग लांग याच्याकडून १३-२१, ७-२१ अशा फरकाने पराभूत झाला़
स्पर्धेतील महिला दुहेरी गटात ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या जोडीला मलेशियाच्या यिन लू लिम आणि ली मेंग यिएन याच्याकडून अटीतटीच्या लढतीत २१-१६, १४-२१, २१-२३ ने पराभवाची नामुष्की ओढावली़ पुरुष गटातील दुहेरीत भारताच्या मनु अत्री आणि बी सुमी रेड्डी या जोडीला पुढची फेरी गाठण्यात अपयश आले़
(वृत्तसंस्था)