सायना, सिंधूचा दमदार खेळ
By Admin | Updated: September 25, 2014 03:50 IST2014-09-25T03:50:07+5:302014-09-25T03:50:07+5:30
सायना नेहवाल आणि पी़ व्ही़ सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंनी आशियाई स्पर्धेत दमदार सुरुवात करीत महिला एकेरीच्या आपापल्या लढती जिंकून पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला

सायना, सिंधूचा दमदार खेळ
इंचियोन : सायना नेहवाल आणि पी़ व्ही़ सिंधू या स्टार बॅडमिंटनपटूंनी आशियाई स्पर्धेत दमदार सुरुवात करीत महिला एकेरीच्या आपापल्या लढती जिंकून पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला.
सायनाने मकाऊच्या की यू तेंग लोचा अवघ्या २६ मिनिटांत २-० असा फडशा पाडून अंतिम १६ जणांमध्ये स्थान निश्चित केले. सायनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीच संधी दिली नाही आणि प्रत्येकी १३-१३ मिनिटे चाललेल्या दोन सेटमध्ये २१-१०, २१-८ अशी बाजी मारली. सिंधूनेही मकाऊच्या की वोंग किट लेगचा १९ मिनिटांत पराभव केला. सिंधूने ही लढत २१-७, २१-१३ अशी जिंकली. याव्यतिरिक्त भारताने महिला आणि पुरुष दुहेरी गटात आगेकूच केली आहे. महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे आणि सिक्की रेड्डी यांनी नेपाळच्या सिच्चया श्रेष्ठा व पूनम गुरुंग या जोडीवर १६ मिनिटांत २१-६, २१-४ असा विजय साजरा केला. पुरुष दुहेरीत सुमित रेड्डी आणि मनू अत्री यांनी मालदीवच्या नशीहू शराफुद्दीन व मोहंमद सरीम यांचा १९ मिनिटांत २१-७, २१-७ असा फडशा पाडून अंतिम १६ जणांमध्ये प्रवेश केला. अक्षय देवाळकर आणि प्रणय चोपडा या भारतीय जोडीने चीनच्या काई युन आणि फू हेफेंगवर २८ मिनिटांत २-० असा विजय मिळवला. (वृत्तसंस्था)