सायना, सिंधू विजयी

By Admin | Updated: November 11, 2015 23:17 IST2015-11-11T23:17:22+5:302015-11-11T23:17:22+5:30

चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी अपेक्षित सुरुवात करताना महिला एकेरीमध्ये विजयी सलामी दिली

Saina, Sindhu wins | सायना, सिंधू विजयी

सायना, सिंधू विजयी

फुझोउ : चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी अपेक्षित सुरुवात करताना महिला एकेरीमध्ये विजयी सलामी दिली. त्याचवेळी पुरुष गटात किदांबी श्रीकांत आणि अजय जयराम यांना मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागल्याने भारताला मोठा धक्का बसला. यामुळे स्पर्धेचा पहिला दिवस भारतासाठी संमिश्र असा राहिला.
या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच बलाढ्य सायनाच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा होत्या. कोरिया, जपान आणि डेन्मार्क येथे झालेल्या स्पर्धेत तिला आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयश आले
होते. याचा फटका तिला जगातील क्रमवारीतही बसला होता.
त्यामुळेच चीन ओपनमध्ये ती कशी सुरुवात करते, याची सर्वांना उत्सुकता होती.
सायनाने या वेळी आपल्या चाहत्यांना निराश न करताना सरळ दोन सेटमध्ये चीनच्या सुन कू को हिचा २२-२०, २१-१८ असा पराभव केला. या वेळी सायनाने दोन सेटमध्ये जरी विजय मिळवला असला तरी तिला या वेळी कडव्या लढतीस सामोरे जावे लागले होते. पहिल्या सेटमध्ये सुन कू हिने सायनाला चांगलेच झुंजवले. हा सेट जिंकून दुसऱ्या सेटमध्ये सायनाने आक्रमक सुरुवात करताना मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा एकदा सुन कू हिने कडवी लढत देताना सामन्यात पुनरागमनाचे जोरदार प्रयत्न केले. दुसऱ्या सेटच्या अंतिम क्षणी सायनाने आपला हिसका दाखवत सुन कूला चुका करण्यास भाग पाडले आणि सलग गुण जिंकताना विजयावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या जिंग यी टी हिचे आव्हान सायनासमोर असेल.
त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पी. व्ही. सिंधूने आपला जलवा दाखवताना रशियाच्या पोलीकरपोवाचा २१-१४, २१-९ असा फडशा पाडला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात सिंधूने पहिल्या सेटनंतर जबरदस्त आक्रमक पवित्रा घेताना पोलीकरपोवाला बॅडमिंटनचे धडेच दिले. तिच्या धडाक्यापुढे रशियाच्या खेळाडूच्या आव्हानातली हवाच निघाली. दरम्यान, स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर कठीण आव्हान असेल. चीनच्या कसलेल्या वांग शिजियानचे तगडे आव्हान असल्याने सिंधूला आगेकूच करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
पुरुष गटात मात्र भारताला जबर धक्का बसला. ज्यांच्यावर विजेतेपदाची मदार होती, ते के. श्रीकांत आणि अजय जयराम दोघांनाही पहिल्याच फेरीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. हाँगकाँगच्या हू यूनविरुद्ध झालेल्या सामन्यात सरळ दोन सेटमध्ये श्रीकांतला १२-२१, १८-२१ असे पराभूत व्हावे लागले. पहिला सेट मोठ्या फरकाने गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्याने पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र खेळ उंचावण्यात अपयशी ठरल्याने त्याला स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला. दुसऱ्या बाजूला अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत
अव्वल असलेल्या चीनच्या चेन लोंगविरुद्ध अजय जयराम १२-२१, ११-२१ असा सपशेल अपयशी ठरला. आता पुरुष एकेरीत एचएस
प्रणय याच्या रूपाने भारताचे आव्हान टिकून आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina, Sindhu wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.