सायना ‘शाईन’; पी़ कश्यप नवा चॅम्पियन
By Admin | Updated: January 26, 2015 03:00 IST2015-01-26T03:00:57+5:302015-01-26T03:00:57+5:30
गत चॅम्पियन भारताच्या सायना नेहवाल हिने पराभवाच्या खाईतून जोरदार मुसंडी मारत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात अजिंक्यपदाचा मान मिळविला़

सायना ‘शाईन’; पी़ कश्यप नवा चॅम्पियन
लखनौ: गत चॅम्पियन भारताच्या सायना नेहवाल हिने पराभवाच्या खाईतून जोरदार मुसंडी मारत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला गटात अजिंक्यपदाचा मान मिळविला़ पुरुष एकेरी गटात पी़ कश्यप याने उत्कृष्ट खेळाच्या बळावर विजेतेपदावर ताबा मिळविला़
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता आणि स्पर्धेत तृतीय मानांकनप्राप्त भारताच्या पी़ कश्यप याने स्पर्धेच्या फायनलमध्ये आपल्याच देशाच्या अव्वल मानांकन प्राप्त के़ श्रीकांतवर अवघ्या ५२ मिनिटांत २३-२१, २३-२१ अशा फरकाने विजय मिळवून जेतेपद पटकावले़ श्रीकांतला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पराभवाची नामुष्की ओढावली आहे़
पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये कश्यपने निर्णायक क्षणी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतचे विजेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळविले़ दरम्यान, अव्वल मानांकन प्राप्त डेन्मार्कच्या मथायस बो आणि कास्टर्न मोगेनसन यांनी पुरुष दुहेरीत विजेतेपद मिळविले, तर महिला दुहेरीत मलेशियाच्या एमेलिया एलिशिया आणि फेई सुंग यांनी अजिंक्यपद मिळविले़ अटीतटीच्या झालेल्या फायनलमध्ये सायना आणि मारिन यांनी आपला सर्वोत्कृष्ट खेळ केला़ मारिन हिने आक्रमक खेळाच्या बळावर पहिला गेम २१-१९ अशा फरकाने सहज जिंकला़ यानंतर दुसऱ्या गेममध्ये रोमांचक खेळ बघायला मिळाला़ मारिनने दुसऱ्या गेममध्ये २१-२० अशी आघाडी मिळविली होती़ आता ती हा सामना सहज आपल्या नावे करील, असे वाटत होते़
मात्र, सायनाने हार मानली नाही़ तिने या गेममध्ये २१-२१ अशी बरोबरी साधली आणि त्यानंतर २२-२१ अशी आघाडी घेतली़ मारिननेही आपल्या खेळाचा स्तर उंचावताना २२-२२ अशी बरोबरी साधली़ सायनाने पुन्हा २३-२२ अशी मुसंडी मारली़ पुन्हा मारिन हिने २३-२३ असा स्कोअर केला़ यानंतर उपस्थित भारतीय प्रेक्षकांनी सायनाचे जोरदार समर्थन केले़ यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय बॅडमिंटन स्टारने अखेर हा गेम २५-२३ ने जिंकत सामन्यात कमबॅक केले़
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूने सामन्यात मुसंडी मारण्याच्या नादात बऱ्याच चुकाही केल्या़ याचाच लाभ घेत सायनाने मारिनवर दबाव निर्माण करीत हा गेम २१-१६ ने जिंकत विजेतेपदाचा ताज पटकावला़ (वृत्तसंस्था)