सायनाला उपविजेतेपद
By Admin | Updated: November 16, 2015 02:49 IST2015-11-16T02:49:47+5:302015-11-16T02:49:47+5:30
संपूर्ण स्पर्धेत धडाकेबाज खेळ करून गतविजेत्याला साजेशी कामगिरी करणाऱ्या भारताच्या फुलराणी सायना नेहवालला चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सायनाला उपविजेतेपद
फुझोऊ (चीन) : संपूर्ण स्पर्धेत धडाकेबाज खेळ करून गतविजेत्याला साजेशी कामगिरी करणाऱ्या भारताच्या फुलराणी सायना नेहवालला चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात सायना पुन्हा एकदा चिनी ड्रॅगनच्या विळख्यात सापडली. कट्टर प्रतिस्पर्धी मानली जाणारी ली जुईरुई विरुद्ध सायनाचा केवळ ३९ मिनिटांमध्ये पराभव झाला.
चायना ओपनची गतविजेती असलेली सायना स्पर्धेत अग्रमानांकित होती. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच तिने शानदार खेळ करताना विजेतेपद राखण्याच्या दृष्टीने आगेकूच केली होती. मात्र, यंदाच्या वर्षात पाचवा अंतिम सामना खेळत असलेली सायना तिसऱ्यांदा अपयशी ठरली. पूर्णपणे एकतर्फी झालेल्या या अंतिम सामन्यात जुईरुई विरुद्ध सायना १२-२१, १५-२१ अशी सपशेल अपयशी ठरली. विशेष म्हणजे याआधी उपांत्य सामन्यात सायनाने चीनच्या सातव्या मानांकित वांग यिहानचा फडशा पाडून दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, तिला हाच धडाका जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू जुईरुईविरुद्ध कायम राखण्यात अपयश आले.
पहिल्या सेटमध्ये सायनाने शानदार सुरुवात करताना ४-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र जुईरुईने ७-४ अशी मुसंडी मारल्यानंतर सलग गुणांचा धडाका लावला. पहिला सेट २१-१२ असा सहज जिंकताना तिने आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सायनाने दमदार सुरुवात करताना ४-० अशी आघाडी घेतली होती. परंतु पुन्हा एकदा खेळावरील नियंत्रण गमावल्याने जुईरुईने ४-५ अशी पिछाडी कमी करून सायनाला गाठले.
यानंतर सायनाने जबरदस्त फटके मारताना सलग ४ गुण घेत ९-४ अशी आघाडी घेतली. १२-६ अशा मजबूत स्थितीत असताना सायनाकडून बरोबरीची अपेक्षा होती. मात्र, येथेच जुईरुईने जोरदार मुसंडी मारताना सलग ७ गुण घेत १३-१२ असे सायनाला मागे टाकले. हाच सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरला आणि यानंतर जुईरुईने सायनाला फारशी संधी न देता दिमाखात विजेतेपद पटकावले.
या सामन्यात सानियाला संभाव्य विजेती मानले जात होते. मात्र अनुभवी जुईरुईने सायना विरुद्धचा आपला शानदार रेकॉर्ड कायम राखताना सहज बाजी मारली. गतवर्षी चायना ओपन पटकावलेल्या सायनाची कामगिरी यानंतर चांगलीच उंचावली होती. २०१५ मध्ये तिने इंडिया ओपन सुपर सिरिज आणि इंडिया ग्रां. प्री. गोल्डचे विजेतेपद पटकावले. तर आॅल इंग्लंड आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
(वृत्तसंस्था)