सायना नेहवालचे स्वप्न भंगले
By Admin | Updated: March 9, 2015 01:29 IST2015-03-09T01:29:36+5:302015-03-09T01:29:36+5:30
आॅलिम्पिक कास्यपदक विजेती बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिचे प्रतिष्ठित आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

सायना नेहवालचे स्वप्न भंगले
बर्मिंगहॅम : आॅलिम्पिक कास्यपदक विजेती बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिचे प्रतिष्ठित आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनण्याचे स्वप्न आज भंगले. अंतिम सामन्यात तिला स्पेनच्या कारोलिना मारीन हिच्याकडून पराभव पत्करावा लागला.
जागतिक क्रमवारीतील तृतीय मानांकित भारतीय खेळाडूकडे इतिहास रचण्याचा गोल्डन चान्स होता; परंतु पहिला गेम जिंकल्यानंतरही त्याचा फायदा ती घेऊ शकली नाही आणि एका तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन स्पेनच्या कारोलिना मारीन हिने सायनाला १६-२१, २१-१४, २१-७ असे पराभूत केले.
या पराभवामुळे सायनला तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद (२00१) आणि प्रकाश पदुकोन (१९८0) यांची बरोबरी करण्यात अपयश आले. गोपीचंद आणि पदुकोन यांनी पुरुष गटात या प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. सायना २00७ पासून आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धेत खेळत आहे. विशेष म्हणजे याआधी ती कधीही कारोलिनाकडून पराभूत झाली नव्हती आणि एक वेळ तर ती अंतिम सामन्यात सहज विजय मिळवेल असे वाटले होते; परंतु त्यानंतर जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या खेळाडूने शानदार मुसंडी मारली आणि भारतीयांच्या आशेवर पाणी फेरले. इसायनाबरोबर करोडो भारतीयांच्या शुभेच्छा होत्या. एवढेच नव्हे तर सचिन तेंडुलकरनेदेखील सोशल नेटवर्किंग साईटवर तिला शुभेच्छा दिल्या होत्या; परंतु सायना अपेक्षेनुसार कामगिरी करू शकली नाही. याआधी २0१0 आणि २0१३ मध्ये उपांत्य फेरीत पराभूत होणारी सायना विजेतेपदाच्या जवळ जाऊनही यश मिळविण्यात अपयशी ठरली.