सायना नेहवाल दुस-या फेरीत
By Admin | Updated: October 24, 2014 03:23 IST2014-10-24T03:23:01+5:302014-10-24T03:23:01+5:30
तथापि, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिचे आव्हान संपुष्टात आले आहे.

सायना नेहवाल दुस-या फेरीत
पॅरिस : स्टार खेळाडू आणि पाचवी मानांकित भारताची सायना नेहवाल आणि राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदकविजेता पारुपल्ली कश्यप यांनी बुधवारी शानदार विजय मिळवताना फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तथापि, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू हिचे आव्हान संपुष्टात आले आहे.
आठव्या मानांकित सिंधूला पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की सहन करावी लागली. सिंधूला थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रासर्तसुक हिने ५६ मिनिटांत १२-२१, २१-१८, २१-१६ असे पराभूत केले. सिंधूने पहिला गेम जिंकून शानदार सुरुवात केली; परंतु त्यानंतर ती आपली लय कायम ठेवू शकली नाही आणि दोन्ही गेममध्ये तिला पराभव पत्करावा लागला.
दरम्यान, सायना नेहवालने फ्रान्सची साशिना विग्नेस वॉरन हिचा अवघ्या ३७ मिनिटांत २१-१६, २१-९, असा पराभव केला. सायनाची पुढील फेरीतील लढत स्कॉटलंडच्या कर्स्टी गिलमूर हिच्याशी होईल.
राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील सुवर्णपदकविजेत्या कश्यपने तृतीय मानांकित जपानच्या केनिची तागो हिचा २१-११, २१-१८ असा पराभव केला. कश्यपने सुरेख सुरुवात करताना जपानी खेळाडूचा अवघ्या ३५ मिनिटांत धुव्वा उडवला. कश्यपची पुढील फेरीतील लढत चीनच्या होऊवेई तियान याच्याविरुद्ध होईल.
पुरुष एकेरीतील दोन अन्य लढतींत भारतीय खेळाडू एच. एस. प्रणय आणि सौरभ वर्मा यांना पहिल्याच फेरीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रणयला जपानच्या केंतो मोमोतो याने एक तास ९ मिनिटांच्या लढतीत २१-११, १५-२१, २२-२० असे, तर सौरभला इंग्लंडच्या राजीव ओसफने ३० मिनिटांत २१-१०, २१-११ असे पराभूत केले. पोनप्पाने ज्वाला गुट्टाच्या साथीने महिला दुहेरीच्याही दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ज्वाला आणि अश्विनी या जोडीने हॉलंडच्या एफ्जे मस्डेंस आणि सेलेना पीक या जोडीवर ५२ मिनिटांत १८-२१, २१-१६, २१-१४ अशी मात केली. (वृत्तसंस्था)