प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सायना अधिक मजबूत
By Admin | Updated: August 2, 2015 23:39 IST2015-08-02T23:39:41+5:302015-08-02T23:39:41+5:30
सायना नेहवाल सध्या जरी खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरली नसली तरी विश्व चॅम्पियनशिपमध्ये ती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास

प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सायना अधिक मजबूत
बंगलोर : सायना नेहवाल सध्या जरी खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरली नसली तरी विश्व चॅम्पियनशिपमध्ये ती चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी व्यक्त केला आहे. या स्पर्धेत ती इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मानसिकदृष्ट्या जास्त
कणखर आणि मजबूत आहे, असेही विमल कुमार यांनी सांगितले.
माजी राष्ट्रीय प्रशिक्षक असलेले विमल कुमार यांनी सांगितले की, विश्व चॅम्पियनशिपमध्ये चांगला खेळ पाहण्यास मिळेल. कारण जागतिक पातळीवर दबदबा असलेल्या चिनी खेळाडूंना गेल्या दहा महिन्यांपासून यश मिळालेले नाही. एशियन गेम्सनंतर गेल्या एक वर्षात स्पेनची कॅरोलीना मारिन, चिनी तैपेईची ताई जू यिंग, थायलंडची रतचानोक इंतानोन आणि सायना या चौघींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. सर्वच अव्वल खेळाडूंकडून कठीण संघर्षाची अपेक्षा आहे. कारण प्रत्येकीला स्पर्धेची तयारी करण्यासाठी पाच आठवड्यांहून जास्त वेळ मिळाला आहे.
स्पर्धेच्या ड्रॉबाबत बोलताना विमल कुमार म्हणाले, सायनाने चांगली तयारी केली आहे; पण तिला कठीण ड्रॉ मिळाला आहे. तिला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तकाहाशी आणि नंतर चीनच्या वांग यिहान हिच्याशी लढावे लागू शकते.
विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यात सायनाला कधीही यश आलेले
नाही. इतकेच नाही तर स्पर्धेची उपांत्यफेरीही गाठण्यात तिला यश आलेले नाही. यंदा मात्र सायना विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणून गणली जात आहे.
प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये सायंकाळचे सराव सत्र संपवल्यानंतर सायना म्हणाली, ‘विमलसरांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केल्यापासून चांगले यश मिळाले आहे. सध्या दुसरे मानांकन असले तरी मी अव्वल क्रमांकही मिळविला होता. या स्पर्धेसाठी मी खूप मेहनत घेतली आहे. खांद्यामध्ये अजूनही थोडासा त्रास जाणवत असला तरी लवकरच ठीक होईल, अशी अपेक्षा आहे.’(वृत्तसंस्था)