सायना पराभूत
By Admin | Updated: June 6, 2015 01:15 IST2015-06-06T01:15:08+5:302015-06-06T01:15:08+5:30
भारताची आॅलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला तिची जुनी प्रतिस्पर्धी शिजियान वँग हिने पराभूत केले.

सायना पराभूत
इंडोनेशिया ओपन सिरीज : अव्वल खेळाडूला पराभूत करून कश्यप उपांत्य फेरीत
जकार्ता : भारताचा पारुपल्ली कश्यप याने जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू चेन लोंग याच्यावर सनसनाटी विजयाची नोंद करताना इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश मिळवला. तथापि, भारताची आॅलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल हिला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला तिची जुनी प्रतिस्पर्धी शिजियान वँग हिने पराभूत केले.
जागतिक क्रमवारीतील १२ व्या मानांकित कश्यपने एक तास तीन मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत चीनच्या प्रतिस्पर्ध्यावर १४-२१, २१-१७, २१-१४ असा खळबळजनक विजय नोंदवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कश्यपने तुलनेत लाँगपेक्षा उजवा खेळ केला.
विशेष म्हणजे लोंग याने कश्यपविरुद्ध याआधी आठपैकी ७ सामने जिंकले होते. गेल्या दोन वर्षांपासून नंबर वनवर कब्जा मिळवलेल्या लोंग याला लिन डॅननंतर चीनचा सर्वात मोठा बॅडमिंटन स्टार खेळाडू मानले जाते. कश्यपने याआधी त्याला याच स्पर्धेत २0१२ मध्ये धूळ चारली होती.
पहिल्या गेममध्ये कश्यप आपल्या दमदार प्रतिस्पर्ध्याविरुद्ध तग धरूशकला नाही. त्यामुळे चीनच्या खेळाडूने ६-२ अशी आघाडी वाढवली. कश्यपने मुसंडी मारताना ११-११ अशी बरोबरी साधली; परंतु लोंगने पुन्हा दबाव निर्माण करताना पहिला गेम २१-१४ असा जिंकला.
दुसरा गेम खूपच चुरशीचा ठरला. दोन्ही प्रतिस्पर्ध्यांनी ७-७ अशी बरोबरी साधली; परंतु कश्यपने नंतर त्याचा खेळ उंचावताना आघाडी मिळवली. चिनी खेळाडूने मुसंडी मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला; परंतु जबरदस्त सूर गवसलेल्या कश्यपने दुसरा गेम जिंकताना बरोबरी साधली.
तिसऱ्या गेममध्येही सुरुवातीला २-२ अशी बरोबरी होती. त्यानंतर कश्यपने लवकरच ९-३ अशी आघाडी वाढवली. लोंग याने केलेल्या चुकीचा आणि त्याचे शॉटस्ही बाहेर गेल्यामुळे कश्यपची आघाडी १४-५ अशी करताना त्याने गेम आणि सामनाही जिंकताना अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित केला. आता त्याची उपांत्य फेरीतील लढत डेन्मार्कच्या यान योर्गेनसन याच्याविरुद्ध होईल.
कश्पने विजयानंतर ट्विट केले, ‘‘आज मोठा विजय केला. आता उपांत्य फेरीतही पाठिंबा कायम ठेवा.’’
दुसरीकडे तीन वेळेसची माजी चॅम्पियन सायना नेहवाल हिला चीनच्या शिजियान हिच्याविरुद्ध ६९ मिनिटे रंगलेल्या लढतीत पहिला गेम जिंकल्यानंतरही पराभव पत्करावा लागला. शिजियान हिने उपांत्यपूर्व फेरीची लढत १६-२१, २१-१२, २१-१८ अशी जिंकली. सायना आणि शिजियान यांच्यात ही १३ वी लढत होती. त्यात चीनच्या खेळाडूने सात सामने जिंकले होते, तर भारतीय खेळाडूच्या नावावर सहा विजय आहे.
सायनाने शिजियानविरुद्ध जबरदस्त सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये ११-५ अशी आघाडी घेतली आणि नंतर ३० मिनिटांतच पहिला गेम जिंकला; परंतु अनुभवी शिजियान हिने त्यानंतर मुसंडी मारताना दुसरा गेम जिंकताना ही लढत आणखी रोचक केली. निर्णायक गेममध्ये सायनाने चांगली सुरुवात करताना ६-३ अशी आघाडी घेतली; परंतु शिजियान हिने ६-६ अशी बरोबरी केली. त्यानंतरही सायनाने पुन्हा १५-१० अशी आघाडी घेण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर १७-१७ अशी बरोबरी झाली; परंतु चिनी खेळाडूने धीरोदात्त खेळ करताना २००९, २०१० आणि २०१२ ची चॅम्पियन असणाऱ्या भारतीय खेळाडू सायना नेहवालचे आव्हान संपुष्टात आणले. (वृत्तसंस्था)