सायनाच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात

By Admin | Updated: May 30, 2015 01:47 IST2015-05-30T01:47:24+5:302015-05-30T01:47:24+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि विद्यमान चॅम्पियन सायना नेहवाल हिला शुक्रवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या वाँग शिजियान हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला.

Saina defeats India's challenge | सायनाच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात

सायनाच्या पराभवाने भारताचे आव्हान संपुष्टात

सिडनी : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू आणि विद्यमान चॅम्पियन सायना नेहवाल हिला शुक्रवारी येथे उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या वाँग शिजियान हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. तिच्या पराभवाबरोबरच भारताचे आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
येथे द्वितीय मानांकित सायनाला आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी चीनच्या खेळाडूंकडून २१-१५, २१-१३ असा पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना ४२ मिनिटांपर्यंत रंगला. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाचा येथे दोन वेळेस आॅल इंग्लंड चॅम्पियन वाँगविरुद्ध १२ व्या सामन्यातील सहावा पराभव ठरला. पहिल्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकाला चांगलीच झुंज दिली. सायना एकवेळ ४-२ अशी आघाडीवर होती; परंतु त्यानंतर सहाव्या मानांकित चिनी खेळाडूने तिच्यावर वर्चस्व राखले. तथापि, एक वेळ १0-१४ अशा पिछाडीवर असताना सायनाने सलग चार गुण घेताना १४-१४ अशी बरोबरी साधली.
तथापि, त्यानंतर वाँगने भारतीय खेळाडूला आपल्यावर वरचढ होऊ न देता सलग सहा गुण घेताना पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्येही चीनच्या खेळाडूने ३-१ अशी आघाडी घेत चांगली सुरुवात केली. सायनाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला; परंतु वाँगने तिला लय मिळू दिली नाही. तथापि, दोन्ही खेळाडूंत पुढे जाण्याची चांगलीच चुरस रंगली. सायनाने यादरम्यान एका गुणाची निसटती आघाडी घेतली; परंतु ती तिची लय कायम ठेवू शकली नाही. भारतीय खेळाडूने केलेल्या चुकीचा पूर्ण फायदा वाँगने घेतला आणि सलग सहा गुण घेताना १४-१0 आणि नंतर १८-११ अशी आघाडी वाढवली. सायनाने नंतर दोन गुण घेतले; परंतु चिनी खेळाडूने तिला मुसंडी मारण्याची संधी मिळू न देता सलग तीन गुण घेताना दुसरा गेम आणि सामनाही जिंकला.
सायनाच्या या पराभवाने भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीतील चौथा मानांकित किदाम्बी श्रीकांत याचे एकेरीतील, तसेच ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा या महिला दुहेरीतील जोडीचे आव्हान आधीच संपुष्टात आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina defeats India's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.