सायनाची आगेकूच
By Admin | Updated: November 12, 2015 23:32 IST2015-11-12T23:32:46+5:302015-11-12T23:32:46+5:30
सध्याची विजेती सायना नेहवाल हिने चायना ओपन सुपरसिरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली पण पी.व्ही. सिंधू मात्र अटीतटीच्या लढतीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली.

सायनाची आगेकूच
झुजोऊ(चीन) : सध्याची विजेती सायना नेहवाल हिने चायना ओपन सुपरसिरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेची गुरुवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली पण पी.व्ही. सिंधू मात्र अटीतटीच्या लढतीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली.
सायनाने मलेशियाची जागतिक क्रमवारीत ३४ व्या स्थानावर असलेली ती जिंग यी हिच्यावर २१-१०, १९-२१, २१-१९ ने विजय साजरा केला. दुसरीकडे विश्व चॅम्पियनमध्ये दोनदा कांस्याची मानकरी ठरलेल्या सिंधूला पहिल्या सेटमध्ये १३-७ अशी आघाडी घेऊनही लाभ मिळविण्यात अपयश आले.
चीनची शिजियान वांग हिच्याकडून ती १ तास २८ मिनिटांत २१-१८, १८-२१, १६-२१ ने पराभूत झाली.
सायनाने पहिल्या गेममध्ये जिंगला कुठलीही संधी दिली नाही. सुरुवातीपासून वर्चस्व गाजवित गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मात्र जिंगने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला.
दुसरा गेम जिंकताच सामना बरोबरीत आला होता. निर्णायक गेममध्ये मात्र जिंगने सुरुवातीला ६-२ अशी आघाडी मिळविल्यानंतरही सायनाने अनुभव पणाला लावून लवकरच ८-८ अशी बरोबरी साधली.
यानंतर उभय खेळाडूंदरम्यान रोमहर्षक खेळ अनुभवायला मिळाला. मलेशियाच्या खेळाडूने काही वेळ १५-१३ अशी आघाडीही नोंदविली पण सायनाने तिला कोंडीत पकडून गेम आणि सामना जिंकला.
महिला एकेरीत सिंधूचा शिजियानविरुद्ध ४-३ चा रेकॉर्ड होता. सुरुवातीच्या आघाडीचा अपवाद वगळता सिंधू आज लयीत दिसली नाही. शिजियानने ५-१ अशी आघाडी मिळविल्यानंतर सिंधूने गेममध्ये ८-८ अशी बरोबरी साधली.
शिजियानने १६-१२ अशी आघाडी केल्यानंतर सिंधूने पुन्हा मुसंडी मारून २०-१७ अशी आघाडी मिळविली व पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या चुकांचा लाभ घेतला.
निर्णायक गेममध्ये शिजियान ११-९ ने पुढे होती. त्यानंतर व्हिडीओ रेफ्रल सिंधूच्या बाजूने येताच १२-१२ अशी बरोबरी झाली. पण सिंधू दडपण आणण्यात अपयशी ठरताच शिजियानने ड्रॉप शॉटसह १७-१४ अशी आघाडी मिळवित सिंधूला पुनरागमनाची संधीच दिली नाही.(वृत्तसंस्था)