मुंबई : महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत मोहिमे’चा संकल्प सोडला आणि देशभरातून त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. ही मोहीम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी याकरिता मोदींनी समाजातील काही प्रतिष्ठीत व्यक्तींनाही पुढाकार घेण्याचे आमंत्रण दिले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही निमंत्रण स्वीकारून त्यात सक्रीय सहभाग घेतला. त्याचबरोबर नुकतीच त्याने आपल्या मित्रांसोबत मुंबईतील एका रस्त्याची साफसफाई केली. सचिनने या रस्त्याची साफसफाई पहाटे साडेचार वाजता केली. त्याचा व्हिडिओ त्याने फेसबुकवर अपलोड केला आहे आणि तो सध्या चांगलाच गाजतो आहे. या व्हिडिओत आपण मोदींचे आमंत्रण का स्वीकारले याविषयीही सचिनने सांगितले आहे. मोदींनी मला स्वच्छ भारत मोहिमेसाठी आमंत्रित केले, तेव्हा मी आनंदाने त्यांचे निमंत्रण स्वीकारले. माझ्या मित्रांना याबाबत कळल्यावर त्यांनीही याकामी पुढाकार घेऊन माझ्यासोबत रस्त्याची साफसफाई करण्याचा निर्धार केला आणि तो निर्धार आम्ही प्रत्यक्षात उतरवला, असे सचिनने म्हटले आहे. अर्थात, ही केवळ सुरूवात आहे. दोन-तीन दिवसांत बदल घडणार नाही, त्याला महिने किंवा वर्षे लागतील. पण प्रयत्न करण्यात काहीच हरकत नाही. आपणच शहरे बकाल करतो. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. मात्र, आता यापुढे आपण काळजी घ्यायला हवी, असा सल्लाही सचिनने नागरिकांना दिला आहे. (प्रतिनिधी)
सचिनची स्वच्छता मोहीम
By admin | Updated: October 6, 2014 11:29 IST