श्रीसंत लागला सरावाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2015 01:49 IST2015-07-28T01:49:02+5:302015-07-28T01:49:02+5:30
क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडल्याने भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याला

श्रीसंत लागला सरावाला!
कोची : क्रिकेटविश्व ढवळून काढणाऱ्या २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी न्यायालयाने निर्दोष सोडल्याने भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याला आता भारतीय संघात पुनरागमन करण्याचे वेध लागले आहेत. त्या दृष्टीने त्याने रविवारपासून सरावास सुरुवात केली आहे.
राजस्थान रॉयल्सचा खेळाडू श्रीसंत, अजीत चंडीला आणि अंकित चव्हाण या तिघांना दिल्लीच्या न्यायालयाने सबळपुराव्यांअभावी निर्दोष ठरविले होते. या तिघांना मे २०१३ मध्ये अटक झाली होती. त्यांची पुढे तिहार कारागृहात रवानगी करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांत बराच त्रास हसन करणाऱ्या श्रीसंतने पहिलाच नेटसराव केला. यावेळी मित्र आणि चाहते त्याच्यासमवेत होते. पांढरा ट्रॅकसूट परिधान केलेल्या श्रीसंतने एडापल्ली हायस्कूल मैदानावर नेटसराव केला. आरोपमुक्त झाल्याने प्रसन्न मुद्रेत असलेल्या या खेळाडूचा जवळपास दोन वर्षानंतरचा हा पहिलाच सराव होता.सराव करण्याआधी पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला,‘ आजपासून तीन आठवड्यात मी सामन्यासाठी स्वत:ला सज्ज करेन.’
श्रीसंतचे आपल्या घरी आगमन होताच चाहते आणि मित्रांनी त्याचे शानदार स्वागत केले. यावर श्रीसंत म्हणाला,‘ नेहमी माझ्या पाठिशी राहणाऱ्या कुटुंबियांचा , मित्रांचा आणि चाहत्यांचा आभारी आहे. माझा हा पुनर्जन्म आहे. यानंतर टेनिसबॉल क्रिकेटजरी खेळायचे झाल्यास मी त्यात उत्साहाने सहभागी होईन.’ बीसीसीआयने मात्र तिन्ही खेळाडूंवरील आजन्म बंदी कायम ठेवली आहे. पण श्रीसंतने बीसीसीआय बंदी मागे घेईल तसेच मी भारतीय संघांत पुनरागमन करू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान बीसीसीआय उपाध्यक्ष व केरळ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष टी. सी. मॅथ्यू म्हणाले,‘ आम्ही बोर्डाला पत्र लिहून श्रीसंतवरील बंदी मागे घेण्याची विनंती करू. (वृत्तसंस्था)