धावांची विराट लाट...
By Admin | Updated: May 19, 2016 05:17 IST2016-05-19T05:17:47+5:302016-05-19T05:17:47+5:30
रॉयल चँलेंजर्स बँगलोरने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजीचे अक्षरश: पीसे काढताना १५ षटकात ३ बाद २११ धावांचा हिमालय उभारला

धावांची विराट लाट...
बंगळुरु : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे झंझावाती शतक आणि विध्वंसक फलंदाज ख्रिस गेलची घणाघाती फलंदाजी या जोरावर रॉयल चँलेंजर्स बँगलोरने किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजीचे अक्षरश: पीसे काढताना १५ षटकात ३ बाद २११ धावांचा हिमालय उभारला. या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची १४ षटकात ९ बाद १२० धावा अशी केविलवाणी अवस्था झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. यामुळे आरसीबीला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ८२ धावांनी बाजी मारली.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पावसाने दमदार हजेरीमुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळविण्याचा निर्णय झाला. यानंतर मात्र कोहली व गेल पंजाबवर बरसले. या दोघांच्या बॅटमधून चौकार व षटकारांची बरसात होऊ लागल्यानंतर चेंडू नक्की कुठे टाकायचा असा मोठा प्रश्न पंजाबच्या गोलंदाजांना पडला.
गेल - कोहली यांनी केवळ ६६ चेंडूत १४७ धावांची जबरदस्त सालामी देत पंजाबची गोलंदाजी फोडून काढली. गेल षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने ३२ चेंडूत ४ चौकार व ८ षटकार ठोकताना ७३ धावा चोपल्या. मात्र कोहलीने आपला दांडपट्टा सुरु करताना पंजाबला सळो की पळो करुन सोडले. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील चौथे शतक ठोकताना कोहलीने केवळ ५० चेंडूत १२ चौकार व ८ षटकार खेचून ११३ धावांचा तडाखा दिला. डिव्हीलियर्सला शून्यावर बाद करण्याचा एकमेव दिलासा पंजाबला मिळाला. यानंतर, अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना दडपणाखाली पंजाबची फलंदाजी कोसळली. युझवेंद्र चहलने (४/२५) अचूक मारा करुन पंजाबच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आणल्या.
>विराटने आयपीएलमध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज.
यंदाच्या मोसमात एकूण ७ शतके झाली. स्पर्धा इतिहासात यंदा सर्वाधिक शतके झाली.
विराट कोहलीचे चौथे आयपीएल शतक. सर्व शतके यंदाच्याच मोसमात
एकाच मोसमात सर्वाधिक शतके झळकावण्याचा कोहलीचा विक्रम
>मोक्याच्यावेळी ख्रिस गेल फॉर्मात
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अडळखती सुरुवात केलेल्या आरसीबीपुढे सर्वात मोठी चिंता होती ती धडाकेबाज ख्रिस गेलच्या हरवलेल्या फॉर्मची. एकीकडे कोहली आणि एबी डिव्हीलियर्स फटकेबाजी करत असताना गेलची बॅट मात्र पुर्णपणे थंडावली होती. त्यातच खराब फॉर्ममुळे कोहलीने त्याली संघाबाहेर बसविण्याचा धाडसी निर्णयही घेतला होता. मात्र कोलकाताविरुध्द काहीप्रमाणात फॉर्ममध्ये आलेल्या गेलने या सामन्यात आपला रुद्रावतार प्रकट करताना पंजाबच्या गोलंदाजांना मजबूत चोपले. यामुळे आरसीबीची फलंदाजी जबरदस्त मजबूत झाली आहे.