सनरायझर्सला नमविण्याचे रॉयल्सचे ‘लक्ष्य’
By Admin | Updated: May 7, 2015 03:45 IST2015-05-07T03:45:08+5:302015-05-07T03:45:08+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवित पराभवाची मालिका खंडित करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल-८ मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादला नमविण्यासह ‘प्लेआॅफ’ गाठण्याचे ‘लक्ष्य’ आखले आहे.

सनरायझर्सला नमविण्याचे रॉयल्सचे ‘लक्ष्य’
मुंबई : दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवित पराभवाची मालिका खंडित करणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल-८ मध्ये गुरुवारी सनरायझर्स हैदराबादला नमविण्यासह ‘प्लेआॅफ’ गाठण्याचे ‘लक्ष्य’ आखले आहे.
रॉयल्सने सलग पाच सामने जिंकून विजयी सुरुवात केली, पण त्यानंतर ओळीने तीन सामने गमावले. शिवाय दोन सामने पावसात वाहून गेले. रविवारी या संघाने दिल्लीवर विजय नोंदवित विजयाची गाडी पुन्हा रुळावर आणली. शेन वाटसनच्या नेतृत्वाखालील रॉयल्सचे मनसुबे हैदराबादला नमवून प्लेआॅफ गाठण्याचे असतील.
सनरायझर्सची वाटचाल चढउताराची ठरली. १६ एप्रिलला विशाखापट्टणममध्ये रॉयल्सने हैदराबादचा सहा गड्यांनी पराभव केला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी हैदराबादकडे असेल. सनरायझर्स सांघिक खेळात अपयशी ठरले. शनिवारी अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या चेन्नईवर २२ धावांनी विजय मिळविला; पण केकेआरकडून पराभवाचा धक्का बसला. सनरायझर्स संघ कर्णधार डेव्हिड वॉर्नर तसेच शिखर धवन यांच्यावर विसंबून आहे. हे दोघे चांगली सुरुवात करण्यास अपयशी ठरताच अन्य फलंदाज नांगी टाकतात.
डेल स्टेन, ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार आणि प्रवीण कुमार यांच्या उपस्थितीत संघाचा वेगवान मारा भक्कम आहे. पण फिरकी मारा कमकुवत वाटतो. ही उणीव दूर करण्यासाठी लेगस्पिनर कर्ण शर्माच्या जोडीला डावखुरा विपुल शर्मा याचा संघात समावेश करण्यात आला. रॉयल्सकडे स्पर्धेत सर्वाधिक धावा ठोकणारा अजिंक्य रहाणे, कर्णधार वॉटसन आणि स्टीव्हन स्मिथ यांचा भरणा आहे. संजू सॅमसन तसेच करुण नायर यांनीदेखील प्रभावी कामगिरी केल्याने आघाडीच्या तिन्ही फलंदाजांवरील ताण कमी झाला. गोलंदाजीत या संघाकडे टीम साऊदी, धवल कुलकर्णी व खुद्द वॉटसन हे विरोधी फलंदाजांना घाम फोडू शकतात.(वृत्तसंस्था)
हेड टू हेड
राजस्थान रॉयल्स आणि सनराइझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ६ लढती झाल्या आहेत. यामध्ये राजस्थानने ४ तर हैदराबादने २ सामन्यांत विजय संपादन केला आहे.
राजस्थान रॉयल्स
शेन वॉटसन : (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुड्डा, धवल कुलकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीवन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजित मलिक, ख्रिस मॉरिस, ज्युुआॅन थेरोन, बरिंदरसिंग सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी,
प्रदीप साहू.
सनरायझर्स हैदराबाद
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, नमन ओझा, केन विलियम्सन, डेल स्टेन, मोझेस हेनरिक्स, इयान मॉर्गन, रवी बोपारा, ट्रेंट बोल्ट, परवेझ रसूल, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, ईशांत शर्मा, आशीष रेड्डी, रिकी भुई, चामा मिलिंद, लक्ष्मीरतन शुक्ला, प्रवीण कुमार, हनुमान विहारी, प्रशांत पद्मनाभन व सिद्धार्थ कौल.