बेंगळुरुचा पंजाबवर 'रॉयल' विजय
By Admin | Updated: May 6, 2015 23:00 IST2015-05-06T21:43:04+5:302015-05-06T23:00:45+5:30
मिशेल स्टार्क व श्रीनाथ अरविंदच्या भेदक गोलंदाजीने किंग्स इलेव्हन पंजाबचा डाव ८८ धावांमध्ये आटोपला असून बेंगळुरुने १३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

बेंगळुरुचा पंजाबवर 'रॉयल' विजय
ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. ६ - मिशेल स्टार्क व श्रीनाथ अरविंदच्या भेदक गोलंदाजीने किंग्स इलेव्हन पंजाबचा डाव ८८ धावांमध्ये आटोपला असून बेंगळुरुने १३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेलची ११७ धावांच्या वादळी खेळी व त्यानंतर गोलंदाजाच्या भेदक मा-याने पंजाबची दाणादाण उडवली.
बुधवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब हे संघ आमने सामने होते. पंजाबने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ख्रिस गेलच्या तडाख्याने पंजाबच्या गोलंदाजीला अक्षरशः उद्धवस्त केले. सलामीवीर ख्रिस गेल व विराट कोहली या जोडीने ११९ धावांची सलामी दिली. या जोडीने १० षटकांत धावफलकावर १०० धावा जोडल्या होत्या. कोहली ३७ धावांवर बाद झाला. त्यानंतर गेल व डिव्हिलियर्स ही विस्फोटक जोडी मैदानात होती. अपेक्षेप्रमाणे या जोडीने धावांची लयलूटच केली. गेलने ५७ चेंडूत ११७ धावा केल्या. यात १२ षटकार व ७ चौकारांचा समावेश आहे. डिव्हिलियर्सने २४ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी केली. या दोघांच्या तुफानी खेळीने बेंगळुरुने २० षटकात २२६ धावांचा डोंगर उभा केला.
गोलंदाज अपयशी ठरल्यावर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या पंजाबच्या फलंदाजांनीही सपशेल शरणागती पत्कारली. मुरली विजय, ग्लॅन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, रिद्धिमन साहा हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. अक्षर पटेलने नाबाद ४० धावांची खेळी केल्याने पंजाबची अब्रू वाचली. उर्वरित नऊ फलंदाजांना फक्त ४८ धावाच करता आल्या. पंजाबचे सात फलंदाज त्रिफळाचीत झाले. मिशेल स्टार्क व श्रीनाथ अरविंदने प्रत्येकी चार विकेट घेतल्या.