रॉयल चॅलेंजर्सची आज अग्निपरीक्षा
By Admin | Updated: May 14, 2016 01:57 IST2016-05-14T01:57:32+5:302016-05-14T01:57:32+5:30
खराब कामगिरी करीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आज, शनिवारी आयपीएलमध्ये गुजरात लॉयन्सविरुद्ध ‘करा किंवा मरा’ या इराद्याने झुंज द्यावी लागेल.

रॉयल चॅलेंजर्सची आज अग्निपरीक्षा
बेंगळुरू : खराब कामगिरी करीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आज, शनिवारी आयपीएलमध्ये गुजरात लॉयन्सविरुद्ध ‘करा किंवा मरा’ या इराद्याने झुंज द्यावी लागेल.
गुणतालिकेत सहाव्या स्थानावर असलेल्या बेंगळुरूला प्ले आॅफ खेळण्यासाठी ओळीने चारही सामने जिंकावेच लागतील. कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघाची आज पहिली परीक्षा असेल. बेंगळुरूचा मागच्या सामन्यात मुंबईकडून आपल्याच मैदानावर पराभव झाला. आजचा सामना गमविला तर प्ले आॅफवर पाणी फेरले जाईल. अशा स्थितीत कोहलीला संघाची नाव पैलतिरी लावायची आहे. ५६८ धावा काढून आॅरेंज कॅपचा मानकरी ठरलेल्या कोहलीची दोन शतके व चार अर्धशतके आहेत. ए बी डिव्हिलियर्सच्या देखील दहा सामन्यांत ४०९ धावा आहेत. के. एल. राहुलने मागच्या सामन्यात ६८ धावा ठोकून आव्हानात्मक धावसंख्या फळ्यावर लावली होती. शेन वॉटसन यानेही अष्टपैलू कामगिरी करीत संघात संतुलन आणले. बेंगळुरूला ख्रिस गेलकडून तुफानी फटकेबाजीची अपेक्षा आहे. कारण या संघाचा मारा कमकुवत आहे. १८० वर धावा केल्यानंतरही त्यांचा पराभव होतो. बेंगळुरूकडून गोलंदाजीत वॉटसन आणि चहल यांचा अपवाद वगळता कुणीही यशस्वी ठरले नाहीत.
आयपीएलमध्ये पहिल्यांदा सहभागी झालेल्या गुजरातचीही नजर पहिले स्थान पटकविण्याकडे लागली आहे. गुजरात संघ लय गमावतोे हीच संघाची मोठी चिंता आहे. ब्रँडन मॅक्यूलम, अॅरोन फिंच, ड्वेन स्मिथ हे तीन फलंदाज अपयशी ठरल्यास पराभवाचा मोठा धोका असतो. गोलंदाजीत ब्राव्होने १२ व धवल कुलकर्णी याने दहा गडी बाद केले. चायनामेन गोलंदाज शिविल कौशिक आणि अनुभवी लेगस्पिनर प्रवीण तांबे यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी अद्याप घडायची आहे. (वृत्तसंस्था)
> गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैना इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात प्रथमच उद्या येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळू शकणार नसल्याचे प्रशिक्षक ब्रॅड हॉज यांनी सांगितले.
रैना खेळणार नसून तो त्याची पत्नी आणि मुलांसोबत आहे. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच रैना एक सामना न खेळण्याची घटना असेल, असे हॉज यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
रैनाच्या जागी ब्रॅण्डन मॅक्युलम कर्णधारपद भूषविण्याची शक्यता आहे; परंतु यावर अद्याप निर्णय झाला नाही, असेही हॉज यांनी सांगितले.