चॅलेंजर्सविरुद्ध रॉयल्सचे पारडे जड
By Admin | Updated: April 24, 2015 09:29 IST2015-04-24T00:39:59+5:302015-04-24T09:29:46+5:30
सलग तीन पराभवांना सामोरे गेलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शुक्रवारी आयपीएल-८ मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स वर्चस्व गाजविण्याची शक्यता आहे.

चॅलेंजर्सविरुद्ध रॉयल्सचे पारडे जड
अहमदाबाद : सलग तीन पराभवांना सामोरे गेलेल्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शुक्रवारी आयपीएल-८ मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स वर्चस्व गाजविण्याची शक्यता आहे.
सहापैकी पाच सामने जिंकणाऱ्या राजस्थानचे दहा गुण आहेत. त्यांचा किंग्स इलेव्हन पंजाबकडून एकमेव पराभव झाला होता. ही लढत टाय झाल्यानंतर सुपरओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली. दुसरीकडे चारपैकी तीन सामने गमविणारा चॅलेंजर्स संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध त्यांना एकमेव विजय मिळाला होता.
किमान कागदावर बंगळुरूकडे सर्वाधिक आक्रमक फलंदाजी आहे. पण सांघिक खेळ करण्यात त्यांना अपयश आले. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रिली रोसोयू हे स्वत:च्या बळावर सामना जिंकून देऊ शकतात; पण स्पर्धेवर अद्याप छाप उमटवू शकले नाहीत. कोहली आणि डिव्हिलियर्स यांनी काही सामन्यांत चमक दाखविली; पण संघाची धुरा ज्याच्या खांद्यावर आहे त्या गेलने चक्क निराशा केली.
चेन्नईविरुद्ध कालच्या सामन्यात तो बाहेर बसला होता. विश्वचषकात स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकविणारा मिशेल स्टार्क याचा वेगवान मारा निष्प्रभावी ठरला. दुसरीकडे राजस्थान पहिल्या सामन्यापासून फॉर्ममध्ये आहे. अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन यांनी चांगली सुरुवात दिली तर स्टीव्ह स्मिथने मध्यम फळीला भक्कम केले. मागच्या सामन्यात मात्र हा संघ पंजाबकडून पराभूत होताच काही उणिवा चव्हाट्यावर आल्या. राजस्थानने काल १९१ धावा उभारल्या; पण गोलंदाजांनी दिशाहीन मारा केल्याने सामना हातून गेला. स्टुअर्ट बिन्नी आणि जेम्स फॉल्कनर यांना गोलंदाजीत बरीच काळजी घ्यावी लागेल. (वृत्तसंस्था)