बंगळुरुचा गुजरातवर १४४ धावांनी 'रॉयल' विजय
By Admin | Updated: May 14, 2016 19:28 IST2016-05-14T17:41:00+5:302016-05-14T19:28:46+5:30
प्लेऑफ गटातील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुजरात लायन्सवर १४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

बंगळुरुचा गुजरातवर १४४ धावांनी 'रॉयल' विजय
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. १४ - प्लेऑफ गटातील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुजरात लायन्सवर १४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. बंगळुरुच्या २४९ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा १०४ धावात खुर्दा उडाला.
एबीडिविलियर्स आणि विराट कोहली बंगळुरुच्या विजयाचे शिल्पकार ठरले. दोघांनी संघाच्या विजयाचा पाया रचला. बंगळुरुच्या गोलंदाजांनीही अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन गुजरातच्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्यामुळे ठराविक टप्प्याने गुजरातचे फलंदाज बाद होत राहिले. गुजरातकडून एरॉन फिंचने सर्वाधिक ३७ धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. बंगळुरुकडून जॉर्डनने सर्वाधिक चार, चाहलने तीन आणि सचिन बेबीने दोन गडी बाद केले.
विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने गुजरात लायन्सला विजयासाठी २४९ धावांचे डोंगराऐवढे लक्ष्य दिले होते. विराट कोहलीने ५५ चेंडूत १०९ तर, डिविलियर्सने ५२ चेंडूत नाबाद १२९ धावांची खेळी केली.
गुजरातच्या गोलंदाजांची लय बिघडवत दोघांनी मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पाडला. विराटने शतकी खेळीत पाच चौकार आणि आठ षटकार लगावले. डिविलियर्सने १० चौकार आणि बारा षटकारांनी आपली खेळी सजवली. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी बंगळुरुला कुठल्याही परिस्थिती आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता.
ख्रिस गेल सहा धावांवर स्वस्तात बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या डिविलियर्सने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. विराट १०९ धावांवर बाद झाला. दोघांनी दुस-या विकेटसाठी २२९ धावांची भागीदारी केली.