रोव्हर्सला आणखी दोन पदके

By Admin | Updated: September 26, 2014 04:37 IST2014-09-26T04:37:04+5:302014-09-26T04:37:04+5:30

भारतीय रोव्हर्सनी गुरुवारी चमकदार कामगिरी करताना दोन पदकांची कमाई केली, तर महिला नेमबाजांनी कांस्यपदक पटकाविले.

Rover has two more medals | रोव्हर्सला आणखी दोन पदके

रोव्हर्सला आणखी दोन पदके

इंचियोन : भारतीय रोव्हर्सनी गुरुवारी चमकदार कामगिरी करताना दोन पदकांची कमाई केली, तर महिला नेमबाजांनी कांस्यपदक पटकाविले. त्यामुळे १७व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकतालिकेतील १५ वे स्थान कायम राखले.
सेनेच्या स्वर्णसिंग विर्कने सिंगल स्कल्समध्ये तिसरे स्थान पटकाविले, तर त्यानंतर ८ खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने कांस्यपदकाचा मान मिळविला. नेमबाजीमध्ये महिला संघाने डबल ट्रॅप नेमबाजीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. भारताने तिरंदाजीमध्ये रौप्यपदक निश्चित केले. या व्यतिरिक्त स्क्वॅशमध्ये भारतीय पुरुष व महिला संघांनी उपांत्य फेरीत धडक मारताना पदक निश्चित केले. हॉकी मैदानावर मात्र भारताची कामगिरी निराशाजनक झाली. भारतीय पुरुष संघाला ‘ब’ गटात खेळल्या गेलेल्या संघर्षपूर्ण लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १-२ने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे पुढील फेरी गाठण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
आज तीन पदकांची कमाई केल्यामुळे भारताच्या खात्यात एकूण १५ पदकांची नोंद आहे. त्यात एक सुवर्ण, एक रौप्य व १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. चीन एकूण १३८ पदकांसह (७२ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३० कांस्य) अव्वल स्थानावर कायम आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया (२८ सुवर्ण, २९ रौप्य, २८ कांस्य) आणि जापान (२२ सुवर्ण, ३३ रौप्य व २८ कांस्य) यांचा क्रमांक आहे.
भारतातर्फे आज रोव्हर्सची कामगिरी उल्लेखनीय ठरली. रोइंगमध्ये भारताने तीन कांस्यपदकांची कमाई केली. दुष्यंत चव्हाणने बुधवारी पुरुषांच्या लाइटवेट सिंगल स्कल्समध्ये कांस्यपदक पटकाविले. २०१० च्या तुलनेत भारतीय ही कामगिरी कमकुवत आहे. त्यावेळी भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य व एक कांस्यपदक पटकाविले होते. कांस्यपदक विजेत्या भारतीय संघात कपिल शर्मा, रणजित सिंग, २०१० मध्ये सिंगल स्कल्समध्ये सुवर्णपदक पटकाविणारा बजरंग लाल ठाकर, पी. यू. रॉबिन, के. सावन कुमार, मोहम्मद आजाद, मणिंदर सिंग, दविंदर सिंग आणि मोहम्मद अहमद यांचा समावेश होता.
भारतीय पुरुषानंतर महिला संघाला सेपकटकरामध्ये यजमान दक्षिण कोरियाकडून पराभव स्वीकारावा लागला़ पुरुष संघाला ‘अ’ गटात दक्षिण कोरियाकडून ०-३ ने पराभवाची नामुष्की ओढावली, तर महिला संघ ‘ब’ गटात ०-३ ने मात खावी लागली़ (वृत्तसंस्था)

Web Title: Rover has two more medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.