रोनाल्डोला ‘गोल्डन बुट’
By Admin | Updated: November 6, 2014 03:21 IST2014-11-06T03:21:25+5:302014-11-06T03:21:25+5:30
युरोपियन स्थानिक लीगमध्ये गत हंगामात सर्वाधिक ३१ गोल करणाऱ्या रिआल माद्रिदच्या क्रिस्टीआनो रोनाल्डोला बुधवारी ‘गोल्डन बुट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रोनाल्डोला ‘गोल्डन बुट’
माद्रिद : युरोपियन स्थानिक लीगमध्ये गत हंगामात सर्वाधिक ३१ गोल करणाऱ्या रिआल माद्रिदच्या क्रिस्टीआनो रोनाल्डोला बुधवारी ‘गोल्डन बुट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा हा पुरस्कार रोनाल्डोला लुईस सुआरेज याच्यासोबत वाटून घ्यावा लागला. सुआरेजच्या नावारही ३१ गोलची नोंद आहे. मात्र रोनाल्डोने तिसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार संघसहकाऱ्यांना समर्पित करीत असून आणखी अनेक वर्षे फुटबॉल खेळायचे असल्याचे मत रोनाल्डोने या वेळी व्यक्त केले.
बॅलोन डी ओर पुरस्कारावर यापूर्वीच नाव कोरणाऱ्या रोनाल्डाने यंदाच्या सत्रात २२ गोल आणि सात असिस्ट केले आहेत. रोनाल्डोच्या झंझावादामुळेच माद्रिदने ला लीगा स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले, तर चॅम्पियन्स लीगच्या पुढच्या फेरीत प्रवेशही निश्चित केला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात इतक्या मोठ्या संख्येत मान्यवरांची उपस्थिती असेल असे वाटलेही नव्हते, अशी मिश्कील प्रतिक्रिया रोनाल्डोने दिली. तो म्हणाला, माझ्या संघसहकाऱ्यांचे आभार मानतो. त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झाले नसते. त्यानंतर माझ्या कुटुंबाचे, चाहत्यांचे आणि क्लबचा ऋणी आहे.
मला वैयक्तिक पुरस्कार आवडतात आणि त्यासाठी कसून मेहनत घेतो. माझ्यासाठी हा पहिला गोल्डन बुट पुरस्कार आहे. माद्रिदमधील माझ्या पहिल्या दिवसापासून ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचा हा पुरस्कार आहे. वचन देतो की माद्रिदसाठी सर्वोत्तम खेळ करण्याचा माझा प्रयत्न असेल. हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे आणि हा स्वीकारताना मला खूप आनंद होतोय. (वृत्तसंस्था)