रोहित-पाक

By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:24+5:302015-02-08T00:19:24+5:30

दडपण आमच्यावर नसून पाकवर : रोहित

Rohit-Pak | रोहित-पाक

रोहित-पाक

पण आमच्यावर नसून पाकवर : रोहित
ॲडिलेड : विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत दडपण परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर राहणार आहे, असे मत भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केले. विश्वकप स्पर्धेत आजतागायत पाकिस्तान संघाला भारताविरुद्ध विजय मिळविता आलेला नाही.
रोहित म्हणाला, 'दडपण आमच्यावर नसून त्यांच्यावर आहे. विश्वकप स्पर्धेत त्यांनी अद्याप आमच्याविरुद्ध विजय मिळविलेला नाही. आम्ही त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करू.'
पाकविरुद्धची लढत नेहमीच महत्त्वाची असते. भारतीय संघ या लढतीत विजय मिळविण्यास उत्सुक आहे. आम्ही केवळ एका लढतीवर लक्ष केंद्रित केलेले नाही. जर आम्ही सकारात्मक विचार केला, तर निकाल नक्कीच अनुकूल राहील. सर्वोत्तम कामगिरी कशी करायची, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. विश्वकप स्पर्धेतील प्रत्येक लढत महत्त्वाची असते. त्यामुळे पहिली लढत काही वेगळी आहे असे मला वाटत नाही, असेही रोहित म्हणाला.
रोहित पुढे म्हणाला, 'एकदा भारताची जर्सी परिधान केली, की चांगली कामगिरीची प्रेरणा सहज मिळते.' रोहित प्रथमच विश्वकप स्पर्धेत खेळणार आहे.
विश्वकप स्पर्धेच्या आठवणीबाबत बोलताना रोहितने १९९२च्या विश्वकप स्पर्धेतील आठवण सांगितली. तो म्हणाला, '१९९२ च्या विश्वकप स्पर्धेत ब्रिस्बेनमध्ये अजय जडेजाने सूर मारत ॲलन बॉर्डरचा टिपलेला झेल आठवतो. याव्यतिरिक्त सेन्चुरियनमध्ये भारत-पाक लढतीत सचिन तेंडुलकरची सर्वोत्तम फलंदाजी बघितली. ती लढत मी कधीच विसरू शकत नाही. नाणेफेकीपासून शेवटच्या चेंडूपर्यंत दडपण होते.' (वृत्तसंस्था)
०००

Web Title: Rohit-Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.