रोहितमुळे मुंबईची फलंदाजी मजबूत
By Admin | Updated: November 7, 2015 01:29 IST2015-11-07T01:29:36+5:302015-11-07T01:29:36+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्यानंतर आक्रमक फलंदाज रोहित शर्माला रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्यासाठी

रोहितमुळे मुंबईची फलंदाजी मजबूत
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान न मिळाल्यानंतर आक्रमक फलंदाज रोहित शर्माला रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने मुक्त केले. यामुळे शनिवारपासून वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या ‘ब’ गटातील उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात यजमान मुंबईचे पारडे जड असेल. शिवाय उत्तर प्रदेशकडून सुरेश रैना आणि भुवनेश्वर कुमारही आपला जलवा दाखवतील.
या सामन्यात चमकदार कामगिरी करून रोहित आणि भुवनेश्वर राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या शिखर धवनची जागा घेण्यासाठी रोहितसाठी ही लढत सुवर्णसंधी असेल. रोहितच्या समावेशामुळे मुंबईचा आत्मविश्वास वाढला आहे. आदित्य तरेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईची फलंदाजी मजबूत दिसत आहे. श्रेयश अय्यर, तरे, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड व रोहित यांच्यामुळे यूपीपुढे आव्हान असेल. मुंबईचे गोलंदाजही चांगलेच फॉर्ममध्ये आहेत.
यूपीचा मारा निर्णायक
अनुभवी प्रवीण कुमारच्या जोडीला भुवनेश्वर कुमार असल्याने यूपी गोलंदाजीला धार आली आहे. त्यांच्या जोडीला पीयूष चावला व चायनामेन कुलदीप यादव यांची फिरकीसुद्धा निर्णायक ठरू शकते.
तर फलंदाजीमध्ये संघाचा आधारस्तंभ सुरेश रैना असेल. रैनाने मुंबईविरुद्ध आपल्या यापूर्वीच्या रणजी सामन्यात शतक व ८० धावा अशी कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची त्याच्याकडून संघाला अपेक्षा असेल.