कर्णधार म्हणून रोहित परिपक्व होत आहे

By Admin | Updated: May 27, 2015 01:34 IST2015-05-27T01:34:54+5:302015-05-27T01:34:54+5:30

महान क्रिकेटपटू व मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरने आयपीएलमधील चॅम्पियन झालेल्या संघाचा कर्णधार रोहित शर्माची प्रशंसा केली.

Rohit is getting mature as captain | कर्णधार म्हणून रोहित परिपक्व होत आहे

कर्णधार म्हणून रोहित परिपक्व होत आहे

कोलकाता : महान क्रिकेटपटू व मुंबई इंडियन्सचा आयकॉन सचिन तेंडुलकरने आयपीएलमधील चॅम्पियन झालेल्या संघाचा कर्णधार रोहित शर्माची प्रशंसा केली. गेल्या काही वर्षांत रोहित कर्णधार म्हणून परिपक्व होत आहे, असे सचिन म्हणाला.
तेंडुलकर पुढे म्हणाला,‘ज्यावेळी रोहितने प्रथम मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले होते त्याची तुलना आजच्या रोहितसोबत केली तर तो आज चांगला कर्णधार असल्याचे दिसून येईल. रोहितचा आत्मविश्वास उंचावलेला असल्याचे आता दिसून येते. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याला अनेकदा उतार-चढाव अनुभवाला मिळालेले आहे. आव्हानाला सामोरे गेल्यानंतरच चांगला खेळाडू होता येते.’
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करीत दुसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले.
तेंडुलकर म्हणाला, ‘यंदाच्या मोसमात रोहितने उपलब्ध पर्यायांचा चांगला वापर केला. बैठकीमध्ये व ड्रेसिंग रुममध्ये आखलेल्या योजना त्याने मैदानावर योग्यपणे लागू केल्या. गोलंदाजांकडून मिळालेल्या फिडबॅकवर कर्णधाराबाबत बरेच काही सांगता येते. गोलंदाज नेहमी कर्णधाराने ठरवलेल्या रणनीतीनुसार गोलंदाजी करतो. बंद रुममध्ये आम्ही अनेक योजना ठरवू शकतो, पण कर्णधार, गोलंदाज व क्षेत्ररक्षकच त्या योजना सत्यात उतरवू शकतात.’ यंदाच्या मोसमात सलग ४ पराभव स्वीकारणाऱ्या मुंबई इंडियन्सने केलेले पुनरागमन शानदार होते, असे सचिन म्हणाला.
सचिनने सांगितले, ‘आमची सुरुवात लौकिकाला साजेशी नव्हती, पण ही कसोटीची वेळ होती. त्यावेळी खेळाडूंनी सांघिक भावनेचा परिचय दिला आणि कसून मेहनत घेतली. हे विजेतेपद म्हणजे केवळ योगायोग नसून आम्ही घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. निकाल बदलण्याची क्षमता असल्याचा आम्हाला विश्वास होता. सुरुवात कशी झाली याला काही अर्थ नसून शेवट कसा झाला, हे अधिक महत्त्वाचे असते. सलग पराभव स्वीकारावे लागल्यानंतरही आमचा आत्मविश्वास डगमगला नव्हता. आम्हाला आमच्या क्षमतेवर
विश्वास होता. हे सत्र कठीण आहे
व आमचे भविष्य चांगले नाही,
असे एकाही खेळाडूला वाटत
नव्हते. आम्हाला नेहमी आशेचा किरण दिसत होता.’
सचिनने आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांची विशेष प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Rohit is getting mature as captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.