रोहित-धवन जोडीच्या नावे तीन विक्रम
By Admin | Updated: June 8, 2017 20:51 IST2017-06-08T20:51:10+5:302017-06-08T20:51:10+5:30
रोहित आणि शिखरने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सात सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये शतकी भागिदारी रचली आहे. 2013 च्या स्पर्धेत रोहित आणि शिखरने दोन वेळा शतकी भागिदारी

रोहित-धवन जोडीच्या नावे तीन विक्रम
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ८ - चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चौथ्यांदा शतकी सलामी दिली आहे. आज लंकेविरुद्ध खेळताना त्यांनी 138 धावांची सलमीची भागिदारी दिली आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमदेखील या जोडीच्या नावावर जमा झाला आहे. विशेष म्हणजे रोहित आणि शिखरने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सात सामन्यांपैकी 4 सामन्यांमध्ये शतकी भागिदारी रचली आहे. 2013 च्या स्पर्धेत रोहित आणि शिखरने दोन वेळा शतकी भागिदारी रचली होती. तर आता सुरु असलेल्या स्पर्धेत रोहित- शिखर जोडीने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरोधात शतकी भागिदारी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
शिखर -रोहितने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी जोडी होण्याचा मानदेखील त्यांनी मिळवला आहे. या जोडीने आतापर्यंत 656 धावा केल्या आहेत. त्यांनी वेस्ट इंडिजच्या चंद्रपॉल झ्र ख्रिस गेल जोडीचा विक्रम मोडीत काढला. चंद्रपॉल-गेल या जोडीच्या नावे चॅम्पियन्स स्पर्धेत 635 धावा आहेत. यानंतर पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफ झ्र शोएब मलिक (414 धावा), सचिन तेंडुलकर झ्र सौरव गांगुली (412 धावा), राहुल द्रविड झ्र सौरव गांगुली (374 धावा) यांचा क्रमांक लागतो.
याबरोबरच लागोपाठ तीन सामन्यांमध्ये शतकी भागिदारी रचण्याचा कारनामा रोहित शर्मा आणि शिखर धवनने केला आहे. याआधी भारताच्या कोणत्याही जोडीला हा कारनामा करणे शक्य झाले नव्हते. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांविरुद्ध रोहित आणि शिखरने सलग शतकी भागिदारी रचल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये123, पाकिस्तानविरुद्ध बर्मिंगहॅमध्ये 136 आणि श्रीलंकेविरुद्ध ओव्हलमध्ये 138 धावांची भागिदारी करत विक्रमाला गवसणी घातली आहे.